रत्नागिरी (Ratnagiri) : महाविकास आघाडी सरकारमधील माजी पालकमंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांचे दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने टेंडर काढले आहे. त्यानंतर टेंडर उघडून ठेकेदार निश्चित केला जाईल. यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यानंतर साईरिसॉर्ट तोडण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्या दिवशी आपण दापोली येथे उपस्थित राहणार आहे. बेकायदेशीर साईरिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आपण आग्रही राहणार आहोत. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही आपण मोकळीक देणार नाही, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री असताना परब यांनी अधिकाराचा वापर करून दापोली येथे बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारले. आपण आवाज उठवल्यानंतर ते सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखविले; परंतु खरेदी-विक्री प्रकरणातील पैसे दिल्याचा तपशील अनिल परब यांनी का लपवला आहे, खरेदी खतामध्ये सर्व तपशील नमूद नसताना उपनिबंधकांनी तो नोंदवून कसा घेतला. ज्या अर्थी चुकीचे खरेदीखत नोंदवून घेतले गेले, याचा अर्थ अधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत होते, हे स्पष्ट झाले आहे. खोटी कागदपत्रे जोडून जागा बिनशेती केली. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आल्याने खोटा दस्तावेज देऊन बिनशेती केल्याचा गुन्हा अनिल परब यांच्याविरोधात दाखल करावा, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनीही चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
साई रिसॉर्टप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी चार पानी जबाब नोंदवून घेतला असून, ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. पोलिस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. दुसऱ्या बाजूला साईरिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी साई रिसॉर्ट तोडले जाईल, त्या दिवशी मी दापोलीत हजर राहीन, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मांडली.