मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या ११ वर्षात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत महामार्गावर एकही झाड लागलेले नाही. त्यामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला मुंबई गोवा महामार्ग बोडका झाला आहे. आता पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्ग हिरवागार होणार आहे. त्यासाठी खड्डे मारण्याचे काम जोरात सुरू आहे. पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे काम २००५ पूर्वी सुरू करण्यात आले. पनवेल-पळस्पे इथून इंदापूरपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर इंदापूर ते कशेडी असा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. त्याचप्रमाणे पुढे कशेडीपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या महाकाय वृक्षांचा बळी गेला. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरची सावली नष्ट झाली. महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती राहिली नाही. तसेच महामार्गावर मोठी उष्णता निर्माण होत आहे. तसेच पर्यावरणाच्या साखळीलाही धोका निर्माण झाला. त्यामुळे वनविभागाने यावर्षी महामार्गालगत वृक्षारोपण करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
वन विभागाच्या माध्यमातून माणगाव ते पोलादपूर या दरम्यान आठवडाभरापासून ठिकठिकाणी खड्डे मारण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे चार बाय चार आकाराचे आहेत. यात वड, पिंपळ तसेच कण्हेर फुलांची आणि महामार्गाच्या कडेला उंच वाढणारी जंगली झाडे लावली जाणार आहेत. पोलादपूरमधील धामण देवी ते दासगावपर्यंत हे काम सुरू आहे. याकरिता लागणारी रोपे देखील तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये उपलब्ध झाली आहेत. पाऊस सुरू होतात महामार्गावर वृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे.
महाड ते पोलादपूर दरम्यान महामार्गावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या कामासाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असून यावर्षी हजारो वृक्ष लावले जातील.
- राकेश साहू, वनक्षेत्रपाल, महाड