कोकणातील 'त्या' खाडी पुलासाठी तब्बल 44 वर्षानंतर टेंडर; मुंबई-अलिबागमधील अंतर...

Bridge
BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : १९८० पासून चर्चेत असलेल्या २.४ किमी लांबीच्या करंजा-रेवस खाडीपुलाच्या बांधकामाची टेंडर प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. सुमारे २ हजार कोटींचे हे टेंडर आहे. ठेकेदाराला ३६ महिन्यात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या खाडीपुलासह आठ किलोमीटर लांबीच्या जोडरस्त्याचाही प्रस्ताव असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाने दिली आहे. या खाडीपुलामुळे रायगड आणि कोकणातील रस्ते मार्गातील अंतर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Bridge
Samruddhi Mahamarg : तिसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला; तब्बल दीड तास वाचणार

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी १९८० साली करंजा-रेवस खाडी पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित करंजा-रेवस खाडी पूल तब्बल ४४ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर पुन्हा दृष्टीपथात येऊ लागला आहे. उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस या दोन बंदरांना जोडणाऱ्या करंजा-रेवस खाडी पुलाच्या उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हा पूल उभारणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उभारणीसाठी सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे ३०० कोटी खर्चाचा नियोजित प्रकल्पाचा खर्च वाढून तो २ हजार ५४ कोटींपर्यंत पोहोचला आहे. या पुलामुळे रेवस-करंजा ही दोन्ही बंदरे या खाडी पुलाच्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच नवी मुंबई-अलिबाग दरम्यानचे सुमारे २० किलोमीटर तर मुंबई अलिबागमधील ७० किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

Bridge
'या' ठिकाणी सर्वात मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र होणार; राज्य सरकार 1700 कोटी खर्च करणार

दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या या पुलामुळे रायगड आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पनवेल, पेण या मार्गांचा वळसा न घालता नवी मुंबईहून उरणच्या करंजा येथून थेट अलिबागला जाता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होईलच. वाहतूक कोडीं अभावी प्रवासही जलद होणार आहे. या पुलाच्या कामाचे बांधकाम आदेश दिल्यापासून ३६ महिने कामाची कालमर्यादा ठेवण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली आहे. करंजा ते रेवस खाडीपूल झाल्यास उरणच्या विकासात अधिकची भर पडण्यास मदत होणार आहे. या खाडीपुलाला उरण शहराच्या बाहेरून म्हणजे नव्याने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड ते करंजा मार्गाला जोड दिली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com