मुंबई (Mumbai) : कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारने नव्याने द्रुतगती विशेष राज्य महामार्ग सहा प्रस्तावित केला आहे. अलिबाग तालुक्यातील शहाबाजवरून रोहा, तळा, माणगाव, म्हसळामार्गे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे हा मार्ग पोहोचणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या गावांची यादी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे.
कोकणात रस्त्याने जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग आहे. तर दुसरा पर्याय रेल्वेमार्ग हा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते झाराप हे काम २०१० साली सुरू झाले होते. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर हा ८४ किमी पहिला टप्पा आजही रखडलेला आहे. ६० वर्षांपूर्वी रेवस रेड्डी सागरी महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र अद्याप सुद्धा हा मार्ग रखडलेला आहे. सरकारने रेवस रेड्डी सागरी महामार्गाला हिरवा कंदील दिला असून भूसंपादनाबाबत ६ जुलैला अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे भविष्यात हा महामार्ग सुद्धा होणार आहे.
कोकणात जाण्यासाठी आता आणखी एका द्रुतगती विशेष राज्य महामार्ग सहाची सुरुवात होणार आहे. सरकारने याबाबतची अधिसूचना काढली असून, महामार्ग कुठल्या गावातून जाणार त्या गावाचे नाव, किती जमीन भूसंपादित होणार त्याचे क्षेत्रफळ, सर्व्हे नंबर याची यादी अधिसूचनेत दिली आहे. अलिबागपासून या महामार्गाची सुरुवात होऊन तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी क्षेत्रपाल या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहे.
अलिबाग तालुक्यातील शहाबाज या गावापासून वालवडे, देहेनकोनी, भाकरवड, मोंडाविरा, पोयनाड, श्रीगाव, तळाशेत ताड वागळे, कोळघर, बोपोली, दळवी खरोशी, बेलोशी, महाजने बोरघर, उमटे, रामराज, मोरोंडे, राजेवाडी येथून रोहा तालुक्यातील सानेगाव, यशवंतखार, शेड सई, महाळुंगे, बिरवाडी, खांबेरे, टेमघर, कवळठे, तांबडी, घोसाळे, विरझोली, ताम्हणशेत मार्गे तळा तालुक्यातील कोडथरे, टोकाडे, तळा, आंबेली, वेलघर, तळेगावतर्फे तळे, चरई खुर्द, दहिवली तर्फे तळे, वावे मोदजवरून माणगाव तालुक्यातून विहुले, डोंगरोली, महाद पोली, कुमशेत, शिरवली तर्फे गोवेले, हुर्डी काचले, मलई कोडवली, मळेगाव, नांदवी मार्गे म्हसळा तालुक्यातून आंबेत, विचारेवाडी मार्गे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहे.