मुंबई (Mumbai) : मुंबई ते सिंधुदुर्ग या सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस-वेच्या उभारणीला आता वेग येणार आहे. 388.45 किलोमीटरच्या या महामार्गाचे बांधकाम चार टप्प्यांत केले जाणार आहे. ताशी १०० किलोमीटर वेगाने या महामार्गावर प्रवास करता येईल. तसेच या महामार्गासाठी शंभर मीटर रुंद भूसंपादनालाही शासनाने मान्यता दिली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च 2020 रोजी विधिमंडळात यासंदर्भातील घोषणा केली होती.
तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात 'एमएसआरडीसी'ची या महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार 'एमएसआरडीसी'ने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यांतील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे.
या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, 100 कि.मी. प्रतितास वेगासाठी महामार्ग संकल्पित करणे, महामार्गासाठी 100 मीटर रुंद भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गामुळे कोकणातील उद्योगवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
तसेच हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, असा दावा आहे.
चार टप्प्यांत होणार बांधकाम
- पेण (बलवली गाव) ते रायगड/रत्नागिरी जिल्हा सीमा : 95.40 कि.मी.
- रायगड/रत्नागिरी जिल्हा सीमा ते गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) : 69.49 कि.मी.
- गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा : 122.81 कि.मी.
- रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी महाराष्ट्र/गोवा राज्य सीमा : 100.84 कि.मी.
- एकूण 388.45 कि.मी.