Deemed Conveyance Tendernama
टेंडरिंग

तुमच्या हाउसिंग सोसायटीचे Deemed Conveyance केले आहे का?

टेंडरनामा ब्युरो

तुम्ही अनेकदा डिम्ड कन्व्हेयन्स (Deemed Conveyance) संदर्भातील बातम्या वाचत असाल, मात्र ही नेमकी काय भानगड आहे याची कल्पना अनेकांना असत नाही. डिम्ड कन्व्हेयन्सला मराठीत मानीव अभिहस्तांतरण असे म्हटले जाते. डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजे नक्की काय, ते का आवश्यक असते आणि ते कसे करायचे याची माहिती आपण समजून घेणार आहोत.

तुमची सोसायटी जुनी (Housing Society) आहे... पुनर्विकास करायचा आहे... तत्पूर्वी मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) करून घ्यावयाचे आहे... परंतु त्यासाठी भोगवटा पत्र (ओसी सर्टिफिकेट) नाही... तर काळजी करू नका.. कारण, भोगवटा प्रमाणपत्र नसेल, मात्र प्रत्यक्ष तुमचा ताबा आहे आणि इमारतीच्या संदर्भातील सर्व जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे स्वः प्रमाणपत्र देण्याची तयारी असेल, तर मानीव अभिहस्तांतरण करताना कोणतीही अडचण येणार नाही.

जमिनीचा मालकी हक्क गृहनिर्माण संस्थेला प्रदान करण्याबाबत मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, अनेक गृहनिर्माण संस्थांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे मानीव अभिहस्तांतरणास अडचणी येत आहेत.

राज्यातील ज्या सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण झाले नाही, अशा सोसायट्यांना जमिनीची मालकी स्वत:च्या नावावर करून देण्यासाठी सहकार खात्याने मानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अर्जासोबत आठ कागदपत्रे आवश्‍यक आहेत. त्यात संबंधित इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राचाही समावेश आहे.

भोगवटा प्रमाणपत्राऐवजी इमारतीचा प्रत्यक्षात ताबा घेतल्याचे आणि इमारतीच्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्याबाबत स्वः प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत.

डिम्ड कन्व्हेयन्ससाठी चार टप्पे

१) डिम्ड कन्व्हेयन्ससाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विहित नमुना सातमध्ये कागदपत्रांसह अर्ज करणे. डिम्ड कन्व्हेयन्सचा आदेश व प्रमाणपत्र दस्तासहित प्राप्त करून घेणे.

२) डिम्ड कन्व्हेयन्सचा मसुदा दस्त सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशीलासह मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेणे.

३) दस्त संबंधित कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे.

४) नोंदणीकृत दस्तानुसार संबंधित नगर भूमापन अथवा मंडल अधिकाऱ्यांकडे सातबारा उताऱ्यावर नोंदणीसाठी अर्ज करणे. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड अथवा सातबारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नाव नोंदविल्यानंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

हे आहेत फायदे

- सहकारी गृहनिर्माण संस्थेस जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होतो

- संस्थेला आणि सभासदांना पुनर्विकासाचे फायदे

- गृहनिर्माण संस्थेला तारण कर्ज मिळण्यासाठी उपयोगी

- एफएसआय अथवा टीडीआरचा लाभ

आवश्यक कागदपत्रे

- विहित नमुना ७ अर्ज

- सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्र

- सर्वसाधारण सभेच्या ठरावाची प्रत

- मिळकत पत्रकाचा तीन महिन्यांच्या आतील उतारा

- संस्थेच्या मिळकतधारकांची यादी व एका सभासदाची विक्री करारनाम्याची प्रत व इंडेक्स २

- मोफा अधिनियम १९६३ अन्वये विकसकास बजावलेली नोटीस

- बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र (नसल्यास स्वः प्रमाणपत्र)

- संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत स्वः प्रतिज्ञापत्र

- मंजूर लेआउटची सक्षम प्राधिकरणाकडील अंतिम मंजूर नकाशाप्रत

राज्यातील स्थिती

- सुमारे दोन लाख : राज्यातील सहकारी संस्था

- सुमारे एक लाख पाच हजार : गृहनिर्माण सोसायट्या