Vijay Wadettiwar Tendernama
टेंडर न्यूज

Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांनी 30 टक्क्यांची मर्यादा ओलांडून केली टेंडरची खैरात

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्यातील सध्याचे मंत्रिमंडळ तुरुंगामध्ये गेले पाहिजे, इतका धिंगाणा घातला आहे. सत्ताधाऱ्यांनी ३० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टेंडर (Tender) वाटले आणि पैसे खाल्ले आहेत. राज्यावर ८ लाख कोटी कर्ज आणि २ लाख कोटींचे देणे आहे. दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केली आहे. तिजोरीवर सफाईदारपणे हात मारला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, की जो जिंकेल त्याला उमेदवारी दिली जात आहे. नाते-गोते नाही तर जिंकण्याची हमी असेल तो उमेदवार असेल. महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वतः लक्ष घातले आहे. ८७ जागा घोषित केल्या आहेत. तर १४ जागांची तपासणी झाली आहे. आम्ही संख्या मोजत नाही, तर जिंकणारे उमेदवार मोजत आहोत.

महाविकास आघाडीचे जिंकू शकणारे उमेदवार आता २०० च्या पुढे जात आहे. तर अनेक जागांवर पुनर्विचार होत आहे. सोशल इंजिनिअरिंग संबंधाने राहुल गांधी काळजी घेत आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपप्रवेशावर वडेट्टीवार म्हणाले, की आम्ही जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करतील याची वाट पाहत होतो, जोरगेवार यांना आम्हाला प्रवेश द्यायचा नव्हता. ते भाजपचे उमेदवार झाले तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. मंत्री मुनगंटीवार यांचा समझोता प्रेमाने झाला की जबरदस्तीने हे निकालानंतर स्पष्ट होईल.

रामटेकचा निर्णय लवकरच

वडेट्टीवार म्हणाले, की साधारणपणे ९ ते १० मतदारसंघांत दुरुस्ती केली आहे. प्रत्येक पक्षाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा पक्ष जागा मागत आहेत. राहुल गांधी यांच्या समोर विषय झाला असून, रामटेकच्या जागेचा निर्णय लवकरच होईल.

आमचा जाहीरनामा येईलच, त्याचा पंचसूत्री कार्यक्रम आहे. दिवाळीची ही शुभ भेट असेल. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. तेलंगणात भाजपवर खोटी जाहिरात दिली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या जाहीरनाम्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्ही आमचा जाहीरनामा आणू.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा