Uddhav Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Uddhav Thackeray : अदानींना आंदण दिलेली मुंबईतील 'ती' जमीन परत घेणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : धारावीकरांना त्यांच्या उद्योग-व्यवसायासाठी हक्काच्या सुविधांसह जिथल्या तिथे घर देणारे नवीन टेंडर काढण्यासोबत अदानींना आंदण दिलेली मुंबईतील जमीन परत घेऊन मुंबईच्या विविध भागांमध्ये एक लाख भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे घर किफायतशीर दरात देणार, तसेच मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) उभारणार असल्याचा शब्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वचननाम्याच्या माध्यमातून दिला आहे.

महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव पुन्हा मिळविण्यासाठी राज्यात येऊ घातलेले आणि राज्यात सध्या असलेले उद्योग आणि रोजगार अन्य राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. महायुती सरकारच्या राजवटीत मागील अडीच वर्षे महाराष्ट्र अराजक अनुभवत आहे. शेती उजाड तर गावे भकास झाली आहेत. शहरे बकाल होत असून गावात काय, महाराष्ट्रात कोठेही रोजगाराची संधी सापडत नाही. या दलदलीतून राज्याला बाहेर काढून महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील जनतेला दिला.

हक्काचे घर

राज्याचे गृहनिर्माण धोरण नव्याने आखणार.

शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील भूमिपुत्रांसाठी परवडणारी घरे बांधण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार.

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांतील नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून हक्काची घरे बांधण्यासाठी कालबद्ध योजना आखणार.

राज्यभरातील पोलिसांसह सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणार.

टीडीआरचा काळाबाजार आणि त्यातील एकाधिकाशाही मोडून काढणार

विकासकावरील प्रेमापोटी त्याला अवाजवी सवलती देणाऱया धारावी पुनर्विकासाच्या नियमबाह्य टेंडरमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर पडणारा असह्य भार लक्षात घेऊन हे टेंडर – अदानी प्रकल्प रद्द करणार.

राज्याच्या किनापट्टीवरील कोळी, आगरी, भंडारी, कुणबी, ख्रिस्ती आणि आदिवासी समाज बांधवांचे वास्तव्य असलेले किनारपट्टी व शहरांतील गावठाणे तसेच कोळीवाडे म्हणजे झोपडपट्टय़ा नव्हेत. तेथील क्लस्टर विकास योजना रद्द करणार. त्यांच्या जमिनींचे सीमांकन – सर्वेक्षण पूर्ण करून त्या भूमिपुत्रांची जमीन आणि हक्क अबाधित ठेवून, त्यांना विश्वासात घेऊन रहायला घर आणि व्यवसायाला जागा देणारा पुनर्विकास करणार.

पर्यावरण

झिरो कार्बनच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून इलेक्ट्रिक वेहिकल धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ई-बसेसची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार.

'महाराष्ट्र कौन्सिल ऑफ क्लायमेट चेंज' पुन्हा एकदा कार्यान्वित करणार.

मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनसह सर्व जिह्यांसाठीचा क्लायमेट अॅक्शन प्लॅन गांभीर्याने राबवणार.

आरोग्य

ग्रामीण भागातील दूरवरच्या ठिकाणच्या रुग्णांसाठी रात्री-अपरात्री सेवा पुरवणाऱया वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रात्रीच्या निवासाची सोय उपलब्ध करून देणार.

पर्यटन

पर्यटन आणि प्रबोधनाची सांगड घालून महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचे अमूल्य योगदान आहे अशा महानुभावांच्या महाराष्ट्रातील स्मृती जपण्यासाठी 'असा घडला महाराष्ट्र' संकल्पनेवर आधारित नवीन पर्यटन स्थळे विकसित करणार.

कोकणातील पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगार यांची सांगड घालत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिह्यांत 'बीच शाक्स ' अर्थात 'चौपाटी कुटी' ही संकल्पना राबवणार.

दुर्लक्षित आणि बंद पडलेल्या एमटीडीसी रिसॉर्ट्स नूतनीकरणासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून आलिशान आणि परवडणारी अशा दोन्ही प्रकारच्या निवासाची सोय असलेली हॉटेल्स विकसित करणार.

शिवरायांचे सर्व गड-किल्ले तसेच प्राचीन मंदिरांच्या दर्शनासाठी पर्यटनाला नावीन्यपूर्ण संकल्पनांची जोड देऊन चालना देणार. राज्यातील सर्व महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष योजना राबवणार.

उद्योग

महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव पुन्हा मिळविण्यासाठी राज्यात येऊ घातलेले आणि राज्यात सध्या असलेले उद्योग आणि रोजगार अन्य राज्यांमध्ये कदापि जाऊ देणार नाही.

महाराष्ट्रात अधिकाधिक परदेशी थेट गुंतवणूक व्हावी तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय सुरू करणे सुलभ व्हावे यासाठी अमेरिका, युरोप, आखात आणि पूर्वेकडील देशांत 'महाराष्ट्र औद्योगिक राज्यदूत' कार्यालय स्थापन करणार.

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा कमी झाले आहे. येत्या 5 वर्षांत योजनाबद्ध औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपले दरडोई उत्पन्न देशात क्रमांक एकचे करणार.

प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यावर – मराठीजनांवर अनेक मौल्यवान संस्कार केले आहेत. भावी पिढ्यांना ही शिवमंदिरे महाराजांचे हे संस्कार आणि प्रेरणा देतील. लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशाही स्थापन झाल्यावर प्रत्येक जिह्यात शिवरायांचे भव्य देखणे, प्रेरणादायी मंदिर उभारण्यात येईल.