Uday Samant Tendernama
टेंडर न्यूज

Uday Samant: फॉक्सकॉन गेल्याने फरक पडत नाही; 59 हजार कोटींची...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : एक फॉक्सकॉन (Foxconn) प्रकल्प गेल्याने महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर काहीही विपरित परिणाम झालेला नाही. उलट परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असून, नागपूरसह पूर्व विदर्भात तब्बल 59 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प येऊ घातले आहेत. या माध्यमातून 30 हजार लोकांच्या हाताला थेट काम मिळणार असून, विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठा बूस्टर डोस मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

उद्याग मंत्री उदय सामंत यांनी पश्चिम आणि पूर्व विदर्भातील उद्योजकांसोबत नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत चर्चा केली. सर्व उद्योजकांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. याकरिता विदर्भातील अकराही जिल्ह्याचे दौरे करणार असल्याचे सांगून त्यांनी विदर्भात अधिकाधिक उद्योग कसे येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात 59 हजार 485 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात रिन्यू पॉवर कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या माध्यमातून नागपुरात सुमारे 20 हजार कोटी, तर अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशन कंपनी भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

कोल गॅसीफिकेशन प्रकल्पाने 14 हजार कोटी, ब्रिटनच्या वरद फेरो लॉईजनेकडून गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे 1 हजार 520 कोटी, तर इस्त्राईलच्या राजुरी स्टील्स अँड ऍलॉईजने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 600 कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारण्याचा सामंजस्य करार दाओसमध्ये केला होता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्पांना जागांचे वाटप करण्यात आले आहे.

नागपूर एमआयडीचा विस्तार

विदर्भातील एमआयडीसीचा विस्तार करण्यात येत आहे. याकरिता अकरा हजार हेक्टर जागेचे भूसंपादन केले जात आहे. त्यात नागपूर विभागातील 5 हजार 685 हेक्टर तर 4 हजार 445 हेक्टर जागेचा समावेश आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 100 कोटीची तरतूद केली आहे.

भद्रावती येथील एमआयडीसीतील पायाभूत सुविधांसाठी 200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट ट्रायबल क्लस्टर उभारण्यात तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचेही सामंत यांनी सांगितले.