मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये युद्धपातळीवर काम सुरु आहे. याअंतर्गत ३ महत्वाच्या आणि आव्हानात्मक नदीवरील पुलांचे बांधकाम नुकतेच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पूर्ण केले आहे.
पहिला पूल नवसारी जिल्ह्यातील पूर्णा नदीवर बांधण्यात आला. या पुलाची लांबी ३६० मीटर इतकी असून हा पूल ९ पूर्ण स्पॅन बॉक्स गर्डरने बनलेला आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरत स्टेशन दरम्यान आहे. भरतीच्या वेळी दर १५ दिवसांनी नदीच्या पाण्याच्या पातळीत ५ ते ६ मीटरने वाढ होत असल्याने पायाभरणीचे काम आव्हानात्मक होते. दुसरा पूल नवसारी जिल्ह्यातील मिंधोला नदीवर बांधण्यात आला. या पुलाची लांबी २४० मीटर आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरत एचएसआर स्टेशन दरम्यान आहे. तर तिसरा पूल नवसारी जिल्ह्यातील अंबिका नदीवर बांधण्यात आला. या पुलाची लांबी २०० मीटर आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरत स्टेशन दरम्यान आहे.
या बांधकामादरम्यान नदीच्या काठाचा तीव्र उतार, ढीग करताना भूमिगत खडकाचे थर, सतत पाण्याचा गळती आणि सुमारे २६ मीटर उंचीच्या (पियर कॅप्ससह) उंचीसाठी नदीत काम करणे अशा आव्हानांचा सामना करावा लागला. आतापर्यंत, बुलेट ट्रेनसाठी चार नदी पुलांचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांत पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गात गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण २४ नदी पूल आहेत. त्यापैकी २० गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये १.२ कि.मी.चा सर्वात लांब नदीवरील पूल नर्मदा नदीवर बांधला जात आहे. तर महाराष्ट्रात २.२८ किमी सर्वात लांब पूल वैतरणा नदीवर बांधण्यात येणार आहे.
नद्यांवर पूल बांधणे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. मिंधोळा आणि पूर्णा नद्यांवर पूल बांधताना अरबी समुद्रातून येणाऱ्या भरती-ओहोटीच्या प्रवाहाकडे विशेष लक्ष दिले जात होते. आमच्या अभियंत्यांनी अंबिका नदीवर सुमारे २६ मीटर उंचीवर पुलाचे बांधकाम पूर्ण केले.
- राजेंद्र प्रसाद, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल