मुंबई (Mumbai) : जम्मू आणि काश्मीरमधील (J&K) चेनाब रेल्वे पूल (Chenab Railway Bridge) हा जगातील सर्वात उंच पूल म्हणून पायाभूत सुविधा क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात या पूलाचे अभियांत्रिकी काम पुर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चेनाब पूल उंचीमध्ये पॅरिसच्या आयफेल टॉवरलाही मागे टाकेल. पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे या पुलाची उभारणी होत आहे. (World highest railway bridge in India)
हा पूल जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग असून या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर मधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला चेनाब पूलाचे काम सुरु आहे. हा पूल पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे बांधला जात आहे. चेनाब नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवरील पूलाचे ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंटसह या महिन्यात पूर्ण होईल. गेल्या वर्षी या पूलाच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले होते.
चेनाब नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवरील ओव्हरआर्क डेक पूर्ण करणे ही एक विलक्षण कामगिरी असेल. या अभियांत्रिकी यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक अभियंता आणि कामगारांबद्दल माझ्या मनात उच्च आदर आहे. हा गोल्डन जॉइंट भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णपर्वाची सुरुवात करेल आणि जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय बनेल. हा पूल आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे.- गिरीधर राजगोपालन, उप व्यवस्थापकीय संचालक, अॅफकॉन्स
पुलाची वैशिष्ट्ये -
- पुलाची लांबी - 1315 मीटर
- बांधकामात 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर
- आर्च बांधकामात - 10,620 मेट्रिक टन स्टीलचा वापर
- पुलाच्या डेकच्या बांधकामात - 14,504 मेट्रीक टन स्टील
- पुलामध्ये 93 डेक सेगमेंट, प्रत्येकाचे वजन 85 टन
- आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच पूल
- पहिल्यांदा फेज्ड अॅरे अल्ट्रासोनिक टेस्टिंग मशीनचा वापर