Sugar Factory Tendernama
टेंडर न्यूज

'त्या' 10 साखर कारखान्यांना दणका; 1100 कोटींच्या वसुलीसाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (Maharashtra Sate Cooperative Bank) सुमारे अकराशे कोटी रुपये बुडवले आहेत. त्यामुळे हे दहा सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासोबत एक सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील तालुका शेतकरी दालमिल प्रक्रिया संस्था विक्रीस काढण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे. त्यासाठी राज्य बँकेने टेंडर जारी केले असून टेंडर भरण्याची अंतिम तारीख १९ मे २०२२ पर्यंत आहे.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड मुंबई 'सेक्युरिटायझेशन अॅंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल अँसेटस अॅंड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२' नुसार १० सहकारी साखर कारखाने व ०१ सहकारी सूत गिरणी या कर्जदार संस्थांची मालमत्ता भाड्याने देणेसाठी व १ प्रक्रिया संस्थेच्या मालमत्तेची विक्रीसाठी मोहोरबंद टेंडर बँकेने मागवली आहेत.

भाड्याने द्यावयाच्या संस्था आणि त्यापुढे थकबाकीची रक्कम...

१) गंगापूर सहकारी साखर कारखाना लि., रघुनाथनगर, तालुका - गंगापूर, जिल्हा - औरंगाबाद, 87 कोटी 19 लाख

२) विनायक सहकारी साखर कारखाना लि., वैजापूर, जिल्हा-औरंगाबाद, 57 कोटी दोन लाख.

३) जिजामाता सहकारी साखर कारखाना लि. दुसरबीड, ता सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा, 79 कोटी 35 लाख.

४) गजानन सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर, जिल्हा- बीड, 91 कोटी 55 लाख

५) महेश (कडा) सहकारी साखर कारखाना लि., कडा, तालुका- आष्टी, जिल्हा- बीड, 33 कोटी 61 लाख

६) शिवाजीराव पाटील निलंगेकर ससाका लि., अंबुलगा, जि-लातूर, 252 कोटी 68 लाख

७) देवगिरी ससाका लि., फुलंबी, जिल्हा - औरंगाबाद, 41 कोटी 64 लाख.

८) स.म.स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना लि., वेळा, ता-हिंगणघाट, जिल्हा-वर्धा, 164 कोटी 66 लाख

९) जयकिसान सहकारी साखर कारखाना लि., बोदेगांव, तालुका - दारव्हा, जिल्हा यवतमाळ, 229 कोटी 44 लाख

१०) स. म. दत्ताजीराव कदम सहकारी सूत गिरणी लि., कौलगे, ता-गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर दहा कोटी 91 लाख

११) जय जवान जय किसान ससाका लि., नळेगांव, जिल्हा लातूर. 84 कोटी 41 लाख

विक्री करावयाची संस्था...

१) तालुका शेतकरी दालमिल प्रक्रिया संस्था लि., मलकापूर, ता- उदगिर, जिल्हा - लातूर. या संस्थेची थकबाकी 4 कोटी 86 लाख रुपये आहे.

हे कारखाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी टेंडर काढण्यात येणार असून टेंडर भरण्याची तारीख 19 मे 2022 आहे, अशी माहिती अनास्कर यांनी दिली आहे.

यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे, त्यानुसार गाळपाचा हंगामही खूप चांगल्या पद्धतीने चालला आहे अद्यापही ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची वसुली या हंगामात चांगल्या पद्धतीने होईल, कारखानदारी या हंगामात अडचणीत नाही, असे मतही अनास्कर यांनी व्यक्त केले.