पुणे (Pune) : पुणे-नाशिक (Pune - Nashik) राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळेफाटा (पुणे जिल्हा हद्दीपर्यंत) दरम्यानच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करा. अन्यथा, या खड्ड्यात कंत्राटदार व अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर टाकून फलक लावण्यात येतील, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळेफाटा (पुणे जिल्हा हद्दीपर्यंत) दरम्यानच्या बायपास रस्त्यांची कामे व महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि सुरक्षाविषयक उपाययोजना आदींचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून खासदार डॉ. कोल्हे यांनी कंत्राटदार व अधिकारी यांना धारेवर धरले. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, कंत्राटदारांवरच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. खड्डे पडल्यावर नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून जबाबदारीने दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. तुम्ही देखभाल दुरुस्तीसह कामांचे पैसे घेता, तर मग आपलं काम जबाबदारीने का करत नाहीत? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करीत असतात. मग त्यांना ही रस्त्यांची झालेली दुरवस्था दिसत नाही का? रस्त्यांची देखभाल दुरुस्तीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’च्या धर्तीवर संबंधित कंत्राटदाराने पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित करावी.
यंदाच्या पावसाळ्यात राजगुरुनगर ते आळेफाटादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता उखडल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी सातत्याने टीकेचे लक्ष्य होत आहेत. चुका तुम्ही करायच्या आणि प्रत्येक वेळी आम्ही टीकेचे लक्ष्य का व्हायचे? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला.