Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन; तब्बल 21 किमीच्या बोगद्यासाठी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भुयारी स्थानक ते कल्याण शिळफाटा या २१ किलोमीटरच्या बोगद्याच्या कामासाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहे. दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी राज्यात आतापर्यंत ३०० हेक्टर भूसंपादन झाले असून, त्यापोटी प्रकल्पग्रस्तांना एकूण २ हजार २४८ कोटी रुपये मोबदला दिल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.

वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भुयारी स्थानक आणि या स्थानकापासून ते कल्याण शिळफाटा असा २१ किलोमीटरच्या बोगदाच्या कामासाठी टेंडर काढले जाणार होते. यात स्थानकासाठी ७ एप्रिल, तर २ मार्चला बोगद्याच्या कामासाठी टेंडर काढण्यात येणार होते. परंतु नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून ते रद्द करण्यात आले. अद्यापही टेंडर काढण्यात आले नसल्याची माहिती कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुल येथील जमीन एमएमआरडीएद्वारा हस्तांतरीत करतानाच वन खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हे टेंडर काढले जाणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, पालघर जिल्ह्याबरोबरच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण सरकारी व खासगी ४३३.८२ हेक्टर जमीन लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील २२ गावे, पालघर जिल्ह्यातील ७३ गावे आणि मुंबईतील दोन ठिकाणांमधील खासगी भूसंपादन नॅशनल हायस्पीड रेल्वेला करावे लागत आहे. सुरुवातीला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूसंपादनाला स्थानिक व लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असतानाच आता याच भागातून भूसंपादनाला काहीशी गती मिळू लागली आहे. यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केली जात आहे, त्यांना चांगला मोबदला दिला जात आहे.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत ४३३.८२ हेक्टर पैकी ३००.४८ हेक्टर भूसंपादन झाले असून त्याचे प्रमाण ७० टक्के आहे. ठाणे जिल्ह्यात १९०.०७ हेक्टर आणि पालघर जिल्ह्यात ११०.४१ हेक्टर भूसंपादन झाले असून मुंबई उपनगरीय मार्गावरील लागणारी जागा अद्यापही संपादित झाली नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात २००१ खासगी भूखंडासाठी २ हजार २४८ कोटी ७८ लाख रुपये मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला आहे.

गुजरातमध्ये १९८ गावांतील जमीन संपादित करावी लागली असून ९५४.२८ हेक्टरपैकी ९४२.५२ हेक्टर भूसंपादन झाले आहे. ९८.७७ टक्के जागा हायस्पीड कॉर्पोरेशनला मिळाली आहे. आतापर्यंत गुजरातमधील ६ हजार २१६ भूखंडासाठी प्रकल्पग्रस्तांना ५८६० कोटी ९९ लाख रुपये मोबदला, तसेच दादरा नगर हवेलीतील ७.९० हेक्टर जमीन संपादित झाली असून १३४ भूखंडासाठी ६९ कोटी ८७ लाख रुपये मोबदला अदा केला आहे.