Ratan Tata, Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

TATA New Project : टाटा आपल्या नावाला जागणार..! असे का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' प्रकल्पात 2800 मेगावॅट वीज निर्मिती; १२,५०० कोटींची गुंतवणूक, ६ हजार रोजगार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अक्षय ऊर्जेमध्ये (Renewable Energy) राज्य वेगाने पुढे जात आहे, अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या (Hydroelectric Project) विकासासाठी राज्य शासन आणि मे. नॅशनल टाटा पॉवर कंपनी (National Tata Power Company) यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) यांनी केले.

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
          
यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजीत पाटील उपस्थित होते.

२८०० मेगावॅटच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मागील काळात उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी राज्य शासनाने चांगले धोरण तयार केले आहे.
           
टाटा पॉवरने हा सामंजस्य करार कृतित आणून वेगाने काम सुरू करावे. यासाठी वैधानिक मान्यता व सर्व मदत करण्यास शासन तयार आहे. टाटा पावर महाराष्ट्रात काम करतेच आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे काम सुद्धा टाटा पॉवर कंपनी त्यांच्या नावाला साजेसे करतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

उदंचन जलविद्युत प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून, ते बॅटरी स्टोरेज प्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर जलविद्युत निर्म‍ितीसाठी केला जातो. टाटा पॉवर लि. कंपनी, राज्यात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे १ हजार मेगावॅट व पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिरवटा येथे १८०० मेगावॅट, असे दोन ठिकाणी एकूण २८०० मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे.
           
या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे १२ हजार ५५० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून, सुमारे ६ हजार इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्म‍िती होणार आहे. ही प्रकल्प ठिकाणे टाटा पॉवर कंपनीने संशोधन करून स्वत: शोधली आहेत.