Tata Motors Tendernama
टेंडर न्यूज

तब्बल 1 हजार डिझेल बस पुरवठ्याचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने मोठे टेंडर जिंकले आहे. उत्तर प्रदेश राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने (यूपीएसआरटीसी) 'टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस' चेसिसच्‍या १,००० युनिट्सचा पुरवठा करण्‍याचे टेंडर कंपनीला दिले आहे. उत्तर प्रदेश सरकारने राबविलेल्या स्‍पर्धात्‍मक ई-बिडिंग प्रक्रियेनंतर टाटा मोटर्सला ही ऑर्डर मिळाली आहे. 

टाटा मोटर्सला गेल्यावर्षीही यूपीएसआरटीसीद्वारे १,३५० ची ऑर्डर मिळाली होती. या बस चेसिसच्या मोठ्या ऑर्डरची यशस्‍वीरित्‍या पूर्तता केल्‍यानंतर यूपीएसआरटीसीकडून पुन्हा १००० बस चेसिसची ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीकडून यूपीएसआरटीसीला बस चेसिसचा पुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने केला जाणार आहे. टाटा मोटर्सच्या बस चेसिसचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरशहरीय व लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी डिझाईन करण्‍यात आलेले टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिस उच्‍च दर्जाची कार्यक्षमता आणि सर्वोत्तम पॅसेंजर कम्‍फर्टसह कमी टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) देते.

ही ऑर्डर मिळाल्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख आनंद एस म्‍हणाले, "आम्‍हाला यूपीएसआरटीसीसोबत सार्वजनिक परिवहनाला विस्‍तारित व सुधारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये सहयोग सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही यूपीएसआरटीसीच्‍या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्‍यास उत्‍सुक आहोत." टाटा मोटर्स कंपनी देशात विविध राज्यातील प्रमुख शहरांना व तसेच परिवहन मंडळांना प्रगत बसेस आणि सार्वजनिक परिवहन सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यात पहिल्या क्रमांकावर आहे. या असंख्य बसेस देशातील कानाकोपऱ्यात रस्‍त्‍यांवर यशस्‍वीरित्‍या धावत आहेत. या बसेसमुळे देशातील प्रमुख शहरे, निम्न शहरे आणि दुर्गम भागांपर्यंत दळणवळणाची सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच लाखो प्रवाशांना दररोज आरामदायी व सुखकर प्रवासाचा आनंद देत आहेत.