मुंबई (Mumbai) : एसटीच्या (ST Bus) सेवेला आता वेग आला असून, हळूहळू एसटीच्या तिजोरीत उत्पन्न वाढ होत आहे. या महिन्यात उत्पन्न आणि प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ होत असून, या महिन्यात फक्त 18 दिवसात 292 कोटी 79 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे 21 लाख उत्पन्न 12 कोटीपर्यंत मिळत होते. त्यामुळे एसटीचा तोट्यातील गाडा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात 1 ते 28 एप्रिलपर्यंत सरासरी प्रवासी संख्या, उत्पन्न आणि बस संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 12 हजार 323 एकूण बसमधून एसटीची सेवा सुरु होती. त्यानंतर आता मे महिन्यात एसटीच्या बसची संख्या 13 हजार 476 वर पोहोचली आहे. ग्रामीण, शहरी आणि लांब पल्यावर धावणाऱ्या बसेस सुरु झाल्या असून, ऑनलाईन आरक्षणालाही एसटी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मे महिन्यात 18 मेपर्यंत एकूण 292 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
त्याशिवाय दैनंदिन एसटीचे प्रवासी 29 लाख 19 हजारावर पोहोचले असून, या महिन्यात 17 दिवसात एसटीची प्रवासी संख्या 4 कोटी 83 लाख 97 हजार पोहोचली आहे. तर याच महिन्यात 18 दिवसात 2 लाख 34 हजार 300 बसेसने आतापर्यंत प्रवासी सेवा दिली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून एसटी पूर्वपदावर येत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.