Aditya Thackeray, Fadnavis, Shinde Tendernama
टेंडर न्यूज

Aditya Thackeray : कांजूर कारडेपो, रस्ते घोटाळ्याविरुद्ध कॅग, लोकायुक्तांकडे तक्रार करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कांजूरला मेट्रो कारडेपो बनवण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय आणि मुंबईतील रस्ते घोटाळा खरा होता याचा प्रत्यय आता शिंदे सरकारच्या निर्णयांमधून येऊ लागला असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले. कांजूर कारडेपो आणि रस्ते घोटाळ्याविरुद्ध कॅग आणि लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्यांचा समाचार घेतला.

कंत्राटे घेऊनही रस्त्यांची कामे होत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात ते म्हणाले की, 31 मे रोजी आपल्या हाती यादी आली तेव्हा एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना ही कामे दिली गेली, परंतु एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. आता तुमचे कंत्राट का रद्द करू नये, अशा नोटिसा या कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत. यावरून हा घोटाळा, घोटाळा आणि घोटाळाच आहे हे सिध्द होते असे आदित्य ठाकरे म्हणाले. पावसाळ्याआधीही कंत्राटदारांना नोटिसा जाणार होत्या, पण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेल्याने त्या थांबवण्यात आल्या होत्या. आता नोटिसा दिल्या आहेत, पण 15 दिवसांत सेटलमेंट होईल, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना काम करता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासकांना विनंती करतो की, माजी महापौर व नगरसेवकांनाही कधीतरी विचारत जा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पावसाळ्यानंतर 1 ऑक्टोबर ते 30 जून या कालावधीत कामे केली जातात, पण आज 13 ऑक्टोबर उजाडला तरी मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. आता कंत्राटे रद्द झाली की पुन्हा टेंडर काढणार, मग कामे कधी होणार, असेच सुरू राहिले तर मुंबईतील रस्ते दोन वर्षे पूर्ण होणार नाहीत, टेंडरसाठी डिसेंबर उजाडणार. दोन वर्षे अशीच जातील तरी मुंबईतील रस्त्यांची कामे होणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. 'जनतेचा पैसा वाचवण्यासाठीच आरेमधून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारडेपो स्थलांतरित करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. ती जागा राज्य शासनाचीच होती. पण केंद्राची असल्याचे सांगून त्याला केंद्रातील भाजप सरकारने विरोध केला. आता खोके सरकारही कांजूरमध्येच कार डेपो बनवतेय. म्हणजे आम्ही बोलत होतो तेच सत्य होते आणि सत्याचा विजय झाला', अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. 'शिंदे सरकार मेट्रो-6 चा कारडेपो कांजूरला करणार आहे. आम्ही मेट्रो 3, 6, 4 आणि 14 या चार लाईन्सचा संयुक्त कारडेपो करणार होतो. त्यामुळे जनतेचे दहा हजार कोटी रुपये वाचले असते आणि सुमारे 4 कोटी जनतेला कनेक्टीव्हिटी मिळाली असती', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मेट्रो बोगी आठवड्यातून एक वेळा आणि तीन महिन्यांतून एकदा सर्व्हिस मेन्टेनन्ससाठी कारडेपोमध्ये येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कारडेपो करण्याची गरज नाही. मेट्रो कारडेपो कुठेही करा, कांजूरमार्गला करा किंवा ठाण्याला करा, पण संयुक्त करा. ज्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या लाईनने अखंडित प्रवास करता येईल आणि पैसे सुद्धा वाचतील, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. 'मेट्रो-3 आणि 4 या दोन लाइन्स मुंबईत तर 4 आणि 14 या दोन लाईन्स मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच ठाण्यामध्ये आहेत. आता फक्त मेट्रो-6 साठी कांजूरला कारडेपो बनवला जाणार आहे. मग उर्वरित जमीन कुणाच्या घशात घालणार? इतर लाईन्ससाठी सरकारला पुन्हा वेगवेगळी कंत्राटे द्यावी लागणार आहेत. त्यासाठी ठाण्यामध्ये कुणाच्या जागा घेणार, त्यात मुख्यमंत्र्यांचे की कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. केवळ कंत्राट, कंत्राट आणि कंत्राट असेच या खोके सरकारचे चालले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नवी मुंबईत अनेक प्रकल्प पूर्ण होऊनही त्यांचे उद्घाटन शिंदे सरकारने केलेले नाही. त्यामुळे तेथील जनतेला त्या प्रकल्पांचा लाभ घेता येत नाही याबाबत प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, नवी मुंबईत तीन ते चार प्रकल्प आहेत जे चार पाच महिने झाले, पूर्ण झाले आहेत. कितीतरी वर्षे रखडले होते. मेट्रो तर जूनपासून तयार आहे. तरीही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना त्यांची उद्घाटने करण्यास वेळ नाही. दिल्लीला नाचत असतात, त्यांना वेळ मिळत नाही. अरे निदान दिल्लीला गेल्यानंतर तरी बटन दाबून उद्घाटन करा. तुम्हाला वेळ नाही म्हणून जनता अडून राहणार हा कोणता न्याय झाला.