Sewri Nhava Sheva Trans Harbour Link road  संग्रहित छायाचित्र
टेंडर न्यूज

मुंबई-पुण्याची वाहतूक कोंडी फोडणारा मार्ग २०२३ मध्ये होणार खुला

विविध कामांसाठी मागविले आणखी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गाचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड) काम वेगात सुरू आहे. या मार्गाचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ मध्ये मार्ग खुला करण्याचे लक्ष्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवले आहे. त्याअंतर्गत एमएमआरडीएने टोल प्लाझा, पथदिवे, टोल मॅनेजमेंट आदी कामासाठी निविदा मागवल्या आहेत.

शिवडी- न्हावाशेवा या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबई शहर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि त्यापुढे सहजपणे प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गाचे काम तीन टप्प्यांमध्ये करण्यात येत असून आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने जायका कंपनीचे अर्थसाह्य घेतले आहे. जायकासोबत झालेल्या करारानुसार, एमएमआरडीएने या मार्गावरील कामे करण्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत.

त्यानुसार डिझाईन, पुरवठा, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग इंटेलिजेंट ट्रान्स्पोर्ट सिस्टीम, टोल मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल वर्क, हायवे आणि ब्रिज स्ट्रीट लाईटिंग, टोल प्लाझा आणि कमांड कंट्रोल सेंटरसह प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार कंत्राटदारांना २१ ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येतील; तर २५ ऑक्टोबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.