Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

कोस्टल रोडवर दुसरा महाकाय बोगदा खोदण्यासाठी 'मावळा' मार्गस्थ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईला वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोडचे (Coastal Road) काम सध्या वेगात सुरू असून या मार्गातील दुसरा महाकाय बोगदा खोदण्यासाठी 'मावळा' बोअरिंग टनेल मशीन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले आहे. गिरगाव चौपाटी येथून प्रियदर्शिनी पार्क येथे 2.071 किमीचा हा बोगदा खोदण्यात येईल. प्रियदर्शिनी पार्क येथे डिसेंबर 2023 मध्ये बोगद्याचा बेकआऊट होईल. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) या प्रकल्पावर 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करीत आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. मुंबई महापालिका या संपूर्ण प्रकल्पासाठी 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करीत आहे. या प्रकल्पात प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी असे दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येकी तीन लेनचे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत. यामधील 12.20 मीटर रुंद आणि 2.070 किमी लांब असणाऱया एका बोगद्याचे काम 10 जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे.

गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधीच हा बोगदा खणून पूर्ण झाला आहे. यानंतर आता दुसरा बोगदा खोदण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत प्रकल्पाचे एकूण 50 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महाकाय बोगद्याची वैशिष्ट्ये -
-
प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेन असतील. जमिनीखाली 10 ते 70 मीटरपर्यंत बोगदे बनवले जात आहेत.
- बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजनची 'सकार्डे यंत्रणा' वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महापालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे.
- देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. बोगदा खोदणारा 'मावळा' या टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल 2300 टन आहे. तर व्यास 12.19 मीटर आहे. 'मावळा'द्वारे खोदकामात निघणाऱ्या दगड-माती-खडी सरीचा वापर भराव, रस्त्यासाठी केला जात आहे.