Ambadas Danve, Sandipan Bhumre Tendernama
टेंडर न्यूज

भुमरेंच्या खात्यात घोटाळा? 70 कोटींच्या टेंडरची SIT चौकशी करा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मनरेगा (MGNAREGA) अंतर्गत शासनाने २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. टेंडर प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

संबंधित विभागाचे सचिव नंदकुमार हे परवा निवृत्त होत आहेत, त्यांनी टेंडर काढण्याचा झपाटा लावला आहे. रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या खात्यात ही टेंडर काढण्यात आली आहेत. २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी ७० कोटी रुपयांची खरेदी टेंडर काढली गेली आहेत. त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल ऍप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. वास्तवित केंद्र सरकारने हे मोबाईल ऍप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च का करण्यात आला, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

१ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार ५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या टेंडर काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही. सचिवांना १ ते ५ कोटी मर्यादेत टेंडर काढण्याचे अधिकार असताना ७० कोटींची टेंडर काढण्यात आली त्याचे कारण काय, असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहेत.

सचिव नंदकुमार निवृत्त होणार असल्याने अवघ्या ११ दिवसांत टेंडर काढली गेली असल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. सॅमसंग कंपनीलाच प्राधान्य देऊन या कंपनीलाच काम देण्यासाठी मंत्र्यांचा आग्रह असल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला.

रोजगार हमी योजना या खात्यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप दानवे यांनी करत याची विशेष तपासामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.