मुंबई (Mumbai) : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) आतापर्यंत १ कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRTC) या महामार्गाचा शेवटचा इगतपुरी ते आमने हा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानंतर नागपूर ते मुंबई असा थेट प्रवास करता येणार असून, 'समृद्धी'वरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. महामंडळाच्या तिजोरीत आतापर्यंत टोलद्वारे (Toll Collection) 826 कोटी रुपये जमा झाले आहेत.
Mumbai Nagpur Samruddhi Expressway हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, १६ टप्प्यांमध्ये हे काम सुरू आहे. नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पार करण्यासाठी सुमारे 55 हजार कोटी खर्च करून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारला जात आहे.
या महामार्गाची लांबी 701 किमी आहे. त्यापैकी नागपूर ते इगतपुरी हा मार्ग यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाला आहे. सध्यस्थितीत या महामार्गावरून दररोज सुमारे 20 हजार वाहने धावत आहेत. मे महिन्यात 8 लाख 22 हजार 166 वाहनांनी समृद्धीवरून प्रवास केला आहे. त्यामुळे मे महिन्यात या महामार्गावरून सर्वाधिक वाहतूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. पहिल्या महिन्यात या महामार्गावरून 2 लाख 20 हजार वाहनांनी प्रवास केला होता. त्यातून महामंडळाच्या तिजोरीत 13 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता, तर या महामार्गाने ऑगस्ट 2023 मध्ये दरमहा 5 लाख वाहनांचा टप्पा पार केला होता.
डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा या मार्गावरून वाहनांनी 7 लाखांचा टप्पा पार केला. तसेच आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हा महामार्ग जसा येण्या जाण्यासाठी योग्य आणि सोयीस्कर आहे. तसेच यावर आतापर्यंत अनेकांनी जीव देखील गमावला आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे गाडीवरील नियंत्रण सुटणे, चालकाला झोप लागणे, टायर फुटणे, दोन वाहनांमध्ये योग्य अंतर नसल्याने, भरधाव वेगात गाडी चालविणे अशा कारणांमुळे अपघात झाले असून, आतापर्यंत 123 गंभीर अपघात झाले आहेत. यात 213 जणांनी जीव गमावला आहे.
समृद्धी महामार्गावरून एक कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. महामार्गाचा शेवटचा इगतपुरी ते आमने टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर नागपूर ते मुंबई अशी थेट जोडणी मिळणार असून, समृद्धीवरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गाने 17 जुलैपर्यंत 1 कोटी 14 लाख वाहनांचा टप्पा पार केला आहे.