Samruddhi Mahamarg News मुंबई : ठाणे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचा (Mumbai Nagpur Samruddhi Expressway) अंतिम ७६ किलोमीटरचा भाग पूर्णत्वास आला असून ऑगस्ट अखेरीस हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (MSRDC) उच्चपदस्थांनी सांगितले. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर, समृद्धी महामार्गाचा संपूर्ण ७०१ किलोमीटरचा कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित होईल.
समृद्धी महामार्गावर ठाणे विभागात 16 पूल आणि चार बोगद्यांचा समावेश आहे. ज्यात फक्त एक पूल अद्याप बांधकामाधीन आहे. ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथे असलेला हा पूल समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक 82 मीटर उंच, 27 मजली इमारतीच्या उंचीइतका आहे. हा पूल दोन खोऱ्यांमध्ये पसरलेला आहे, ज्यामुळे बांधकाम विशेषतः गुंतागुंतीचे झाले आहे. याव्यतिरिक्त, 76 किलोमीटरचा भाग डोंगराळ प्रदेशातून जातो, असेही एमएसआरडीसीतील उच्चपदस्थांनी सांगितले.
पुलावरील सर्वात लांब अंतर 140 मीटर आहे. उंची आणि वाऱ्याचा वेग यामुळे सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी बांधकामाचे काम अतिरिक्त सावधगिरीने केले जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
सध्या, समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वर्षाच्या सुरवातीला नाशिक जिल्ह्यातील भरवीर आणि इगतपुरी शहरादरम्यानचा अतिरिक्त २५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचा विस्तार गडचिरोली, गोंदिया, जालना आणि नांदेडपर्यंत करण्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच या प्रकल्पांचे कार्यादेश दिले जाणार आहेत.