Sambhajinagar Tendernama
टेंडर न्यूज

Sambhajinagar: कॉंक्रिटच्या रस्त्यांना का येतेय नद्यांचे स्वरूप?

पाण्याचा निचरा अन् खोदकामाला 'खो' नको; अन्यथा घरात अन् दुकानांमध्ये पाणी शिरणारच

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : डांबरी रस्ते लवकर खराब होतात म्हणून खड्डेमुक्तीसाठी पर्याय म्हणून शहरात काँक्रिटचे रस्ते बांधण्यावर भर देण्यात आला. यामुळे रस्ते खराब होण्याच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होतील, असे वाटले होते. मात्र सदोष ड्रेनेज व्यवस्था व नव्या काॅंक्रिट रस्त्यांची वाढलेली उंची व त्यांच्या जोड रस्त्यांची कमी असलेली ऊंची यामुळे अवकाळी पावसाच्या बॅटींगने शहर परिसरातील रस्त्यांवर पावसाने पाणीच पाणी केले.

हे कमी म्हणून की काय रस्त्यालगत नागरिकांच्या घरात अन् दुकानांमध्ये पाणी शिरले. आधीच रोगराई पसरलेल्या शहर परिसरात साचलेल्या पाण्यामुळे ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली. आता तरी काॅंक्रिट रस्ते करताना महापालिकेने जमीनस्तरावरील रस्त्याचे जास्तीत जास्त खोदकाम करून जोडरस्त्यांच्या समान उंचीपर्यंत थर ठेवावेत.

रस्ते बांधकाम करताना पाण्याचा निचरा करणाऱ्या स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेला 'खो' न देता ती उभारण्याची गरज आहे. यासाठी अंदाजपत्रकात त्याचा समावेश करावा, असे मत तज्ज्ञांनी 'टेंडरनामा'शी बोलताना व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्याही महत्त्वाच्या व अंतर्गत छोट्या - मोठ्या रस्त्यांवर दर वर्षी पडणारे खड्डे आणि त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणार त्रास, त्यापोटी हे रस्ते तयार करणाऱ्या; तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांवर होणारी प्रचंड टीका, नाराजी व नापसंती दर पावसाळ्यात दिसायची. यावर डांबरी रस्त्यांऐवजी टिकाऊ काँक्रिटचे रस्ते बांधणेच योग्य असल्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप काबळे यांनी घेतला होता.

डांबरी रस्त्यांना खड्डे का पडतात, याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यात रस्त्यांचे फ्लेक्झिबल (लवचिक) व रिजिड (टणक) असे दोन प्रकार अभ्यासकांनी मांडले होते. यात डांबरी रस्ते पहिल्या, तर काँक्रिटचे रस्ते दुसऱ्या प्रकारात मोडतात.

तज्ज्ञांनी दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या अर्थात (टनक) काॅंक्रिट रस्त्यावरच भर दिल्याने शहरात २०१३ ते २०२३ दरम्यान सरकारी अनुदानातून, तसेच आमदार खासदारांच्या निधीतून कोट्यवधींचे काॅंक्रिट रस्ते बांधन्यात आले. मात्र महापालिकेतील अधिकारी अथवा प्रकल्प सल्लागाराने रस्ते बांधकाम करताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योजना हवी, असा मुद्दाच कधी टेंडरमध्ये नमूद करण्याचा सल्ला दिला नाही. अथवा प्रशासकीय प्रमुखांना देखील अंदाजपत्रक तपासताना त्याची गरज वाटली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजुने जर स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा उभारली, तर रस्त्यात साचणारे पाणी यंत्रणेतून आसपासच्या नाल्यात जाऊ शकते व प्रत्यक्ष रस्ता आणि त्याखालील जमीन ओली होणार नाही; त्यामुळे बांधलेले रस्ते पावसाळ्यात देखील टिकतात. त्यामुळे रस्त्याच्या बाजूस मोठ्या पर्जन्यवाहिन्या किंवा मोठी गटारे असल्यास पाणी त्यातून वेगाने वाहून गेल्यास रस्ते खराब होत नाहीत.

तथापि, छत्रपती संभाजीनगरात रस्ते बांधकाम करताना या योजनेची अंमलबजावणीच केली जात नाही. परिणामी रस्त्यावरचे पाणी वाहून न जाता, बरेच दिवस ते रस्त्यावरच साचून राहते. यामुळे रोगराई पसरते. शिवाय रस्त्याचा पृष्ठभाग खराब होऊन जमिनीखालचा स्तर भूसभुशीत होऊन रस्त्याची भारवाहन क्षमता कमी होते. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा तो भाग दबतो; त्यामुळे मोठे खड्डे पडतात.

काॅंक्रिट रस्त्यांचा पृष्ठभाग हा खडीयुक्त सिमेंटचा असतो, असे म्हणतात पण यात सिमेंट ऐवजी क्रशसॅन्ड वापरले जाते. याशिवाय, रस्त्यांची कामे योग्य गुणवत्तेने न होणे, खडीमध्ये काॅंक्रिटचे  प्रमाण योग्य नसणे, काॅंक्रिटीकरण करताना योग्य तापमान नसणे, खडी सच्छिद्र असणे (जेणेकरून छिद्रांमध्ये पाणी जाऊन काॅंक्रिट व खडी वेगळे होणे), रस्त्यांच्या थराची जाडी योग्य नसणे अशी अन्य कारणेही असतात.

रस्त्याच्या पृष्ठभागातून खाली पाणी जाणे धोक्याचे असल्याने, पाण्यासाठी हा भाग अभेद्य असावा लागतो. छत्रपती संभाजीनगरात सेवा वाहिन्यांचे जाळे देखील रस्त्याखाली असते, त्याच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदला जातो; त्यामुळे ही अभेद्यता संपते.

रस्त्याचे काम करताना कमी वेळात अधिक लांबीचे रस्ते तयार केले जातात. भोवतालचे रस्ते, घरे आणि दुकाने आधी रस्त्यापेक्षा अधिक उंचावर असतात. मात्र काॅंक्रिट रस्त्याचे बांधकाम झाल्यावर त्या खाली दबतात. त्यात रस्त्यालगत तयार केल्या जात असलेल्या फुटपाथचा उतार रस्त्याच्या दिशेने दिला जातो. परिणामी, तेथील पाणी रस्त्यावर येते. त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी साठते. रस्ते हेच पर्जन्यवाहिन्या किंवा नद्या बनतात.

पावसात रस्त्यावर पाणी साठल्याने काॅंक्रिट रस्त्याचा पृष्ठभाग खराब होतोच; परंतु रस्त्याखालील जमिनीची भारवाहन क्षमता संपत जाते. अशा वेळी रस्त्यांची क्षती होणे साहजिक आहे. उत्तम गुणवत्तेचे रस्तेही या परिस्थितीत क्षतिग्रस्त होण्याची शक्यता शास्त्रीय कारणांचा मागोवा घेता नाकारता येत नाही.

म्हणे ३० वर्षे टिकणारे रस्ते

काँक्रिटचे रस्ते डांबरी रस्त्यांच्या दुप्पट महाग पडतात. छत्रपती संभाजीनगरात गत दहा वर्षापासून अत्यंत खर्चिक असलेले काँक्रिट रस्ते बनविने सुरू आहे. या रस्त्यांचे आयुष्यमान २० ते ३० वर्षांचे असते, असा गवगवा केला जातो. त्यांचा देखभाल खर्चही कमी असतो, अशी जाहिरातबाजी केली जाते.

मात्र काँक्रिटचे रस्ते तयार करताना वाहतूक क्षमतेचा विचार केला जात नाही. जिओलाॅजिकल सर्व्हे केला जात नाही. माती परिक्षण केले जात नाही. एका बाजूने काम झाली की, तेथे लगेच वाहनांची पार्किंग होते. काम संपताच वाहनांसाठी रस्ते खुले केले जातात. क्युरींग पिरेड पाळला जात नाही.

वाहतुकीस पडणारा ताण, वाहने खोळंबल्यामुळे वाया जाणारे इंधन व प्रवाशांच्या वेळेचा विचार करता, काँक्रिट रस्त्यांचा विचार हा योग्य असला तरी मानकाप्रमाणे ते केले जात नसल्याने या रस्त्यांवर महिन्याभरातच खड्डे पडतात. परिणामी २० ते ३० वर्षे टिकणारे हे रस्ते वर्ष - सहा महिनेही टिकत नाही. गत दहा वर्षांत झालेल्या काॅंक्रिट रस्त्याची तपासणी केली असता प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांची समस्या आ वासून उभी असल्याचे दिसते.