Nala Safai Tendernama
टेंडर न्यूज

Sambhajinagar : महापालिकेचा धक्कादायक कारभार, नालेसफाईसाठी...

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम मार्गी लावण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांच्या खाबुगिरीला लगाम लावत स्वतःची यंत्रणा खरेदी करून नालेसफाईच्या कामातून कोट्यावधी रूपये वाचवल्याचा दावा केला असला, तरी दाट वसाहतीतून जाणाऱ्या छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेकडे कुठलीही यंत्रणा नाही. यासाठी खाजगी ठेकेदारांमार्फत मजुरांना हजेरीने लावून नालेसफाईचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र या ठेकेदाराच्या कामाकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून, शहरातील नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणात बालकामगारांचा वापर होत असल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. अवघ्या अल्प दरात या बालकामगारांकडून शहरातील छोटे पण अत्यंत गलिच्छ नाले स्वच्छ करून घेतले जात आहेत. धक्कादायक म्हणजे काही दिवसापूर्वीच शहरातील हिमायत बागेत चेंबर साफ करताना तीन मजुरांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असताना बालकामगारांना संबंधित ठेकेदारांनी थेट सुरक्षाकवच विनाच नाल्यात उतरवल्याचे चित्र 'टेंडरनामा'ने कॅमेऱ्यात कैद करताच ठेकेदाराने कामावरून पळ काढला. या गंभीर प्रकाराकडे मात्र पालिका कारभार्यांचे  दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत.

 छत्रपती संभाजीनगर शहरातील नालेसफाईचे काम तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तीककुमार पाण्डेय यांनी सुरू केलेल्या प्रथेप्रमाणेच तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांनी दोन महिन्यापूर्वीच सुरू केले होते. शहरातील १३५ कि.मी. लांबीच्या मोठ्या नाल्यांसाठी पाण्डेय यांनी कोट्यावधी रूपये खर्च करून ९ जेसीबी, तीन पोकलॅन्ड, तीन टिप्पर खरेदी केले होते. त्यामुळे टेंडर काढून थातूरमातूर नालेसफाई करून कोट्यावधींना चुना लावणार्या ठेकेदार लाॅबीला पांण्डेय यांच्या निर्णयाने चांगलाच चाप बसला. त्याच धर्तीवर पांण्डेय यांच्यानंतर महापालिकेचा पदभार घेणार्या चौधरी यांनी मोठ्या नाल्यांची सफाई दोन महिन्यांपूर्वीच सुरू केली होती. यामुळे सलग तीन वर्षापासून महापालिकेचे नालेसफाईच्या कामावर पंधरा ते वीस कोटी रूपये वाचल्याचा महापालिका कारभार्यांचा दावा आहे.

मात्र जुन्या व नव्या शहरासह सिडको-हडको, गारखेडा, उस्मानपुरा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मिटमिटा,हर्सुल, विटखेडा, सातारा-देवळाई आदी भागातील गुंठेवारीतील दाट वसाहतीतील छोट्या नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने तिथे पोकलॅन्ड, जेसीबी ही यंत्रणा नाल्यात उतरवता येत नाही. परिणामी या गल्लीबोळातील छोट्या नाल्यांमध्ये मजुरांना नाल्यात उतरवून टिकाव फावड्याने नाले सफाई केली जाते. शहरातील एकूण लहान-मोठे अशा  नाल्यांच्या साफसफाईसाठी खाजगी ठेकेदारामार्फत मजुर लावून नाले सफाई केली जाते. यात मजुरांना केवळ पाचशे रूपये हजेरी दिली जाते. कामगारांकडून नालेसफाई करण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रूपये खर्च दाखवला जातो. नालेसफाईसाठी मजुरांचा पुरवठा करणार्या काही राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीय आणि जवळच्या ठेकेदारांना  हे काम देण्यात येते. मात्र नालेसफाई करण्यासाठी नाल्यात उतरत असलेल्या कामगारांना कुठलीही सुरक्षा साधने पुरवण्यात येत नसल्याने हातानेच नाल्यातील कचरा आणि गाळ घमेल्यात टाकून साफ करावा लागत आहे. शहरातील अनेक नाल्यांत जवळील झोपडपट्टीतील लहान मुलांचा वापर करत नालेसफाई करण्यात येत असल्याचे चित्र 'टेंडरनामा'च्या कॅमेऱ्याद कैद झाले  आहे. तसेच या मुलांना अल्प मोबदला देत त्यांच्याकडून शहरातील छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र या गंभीर प्रकरणाकडे पालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याची खेदजनक बाब समोर येत आहे.

नालेसफाई किती योग्य प्रकारे केली जात आहे, याची देखरेख करण्याचे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांचे असताना दुय्यम आवेशक, कनिष्ठ, शाखा व उप अभियंत्यासह वार्ड अभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता व आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र पालिकेत ऐसीत बसून राहण्यातच समाधान मानत आहेत. त्यामुळे ठेकेदार आपल्या मनाप्रमाणे बालकामगारांना नालेसफाईच्या कामात जुंपून नालेसफाई करून घेत आहेत. या प्रकरणी ठेकेदारासह पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता बी.डी.फड यांना प्रतिनिधीने दहा वेळा संपर्क केला मात्र वृत्त लिहीपर्यंत त्यांची बाजू समजू शकली नाही.

मजुरांचे ठेकेदाराकडे बोट

दुसरीकडे बालकामगारांना हजेरी आणि सुरक्षाकवचाबाबत विचारले असता त्यांनी नालेसफाईच्या कामापासून दुर पाइपांवर बसलेल्या ठेकेदाराकडे बोट दाखवले.

बघा काय म्हणाला ठेकेदार

प्रत्यक्षात ठेकेदाराची भेट घेऊन  प्रतिनिधीने त्यांना विचारले असता, त्याने महापालिकेमार्फत छोट्या नाल्यांचे काम सुरू आहे, मजुर महापालिकाच लावते, त्यांच्याच वाहनांनी मजुरांची ने - आण केली जाते, प्रत्येक मजुराला पाचशे रूपये हजेरी दिली जाते, माझ्याकडे फंक्त देखरेखीचे काम आहे, कामगारांना सुरक्षासाधने पुरविल्याची महापालिकेतील भांडार विभागात फंक्त नोंद होते. प्रत्यक्षात काही दिले जात नाही, तुम्हाला काय विचारायचे ते अधिकार्यांना विचारा, असे म्हणत ठेकेदार दुचाकीवर बसून गायब झाला.

व्यक्त केला बालकामगारांनी संताप

ठेकेदार बालकामगारांना वार्यावर सोडून जाताच नाल्यात काम करणारे १७ बालकामगार 'टेंडरनामा' प्रतिनिधीजव॓ळ गोळा झाले. 'साहेब' हाच आमचा ठेकेदार आहे, तो तुम्हाला थाप मारून पळाला, यानेच आम्हाला कामावर आणले, हाच आम्हाला हजेरी देतो, असे म्हणत खोटे बोलून पळालेल्या ठेकेदारावर या बालकामगारांनी संताप व्यक्त करत थेट नालेसफाईचे  काम बंद करून कामावरून  निघुन गेले. कुठल्याही सुरक्षा साधनांच्या विना बालकामगारांचा नालेसफाईसाठी वापर केल्याने ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर महापालिका प्रशासक तथा आयुक्त आता  काय कठोर कारवाई करणार याकडे आता 'टेंडरनामा'चे लक्ष आहे.

कामगार उपायुक्तांकडे तक्रार करणार 

आपल्याकडील उपलब्ध झालेल्या छायाचित्रावरून नालेसफाई करणाऱ्या मुलांचे चेहरे पाहिले असता ते प्रत्यक्षदर्शनी बालकामगारच वाटत आहेत. यासंदर्भात सोमवारी कामगार आयुक्तांना तक्रार करणार. मुलांचे छायाचित्र देखील सोबत जोडले जाईल. या प्रकरणी संबंधित मुलांचे शालेय दाखले देखील मागवले जातील. त्यावरून त्यांचे वय निश्चित केले जाईल. काही दिवसापूर्वीच चेंबर साफ करताना तीन सफाई मजुरांचा मृत्यु झाल्याची घटना शहरात घडली असताना आम्ही मोठे आंदोलन केले होते. मजुरांना प्रत्येकी दहा लाख रूपये मिळवून दिले. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासकांनी यापुढे स्वच्छताकवच दिल्याशिवाय सफाई कर्मचार्यांकडून चेंबर आणि नालेसफाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. प्रत्यक्षात  नालासफाई करणार्या मुलांच्या हातात, डोक्यात आणि पायात काही सुरक्षासाधने दिसत नाही. महापालिकेतील दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर निश्चित कारवाई करण्यास भाग पाडणार कारण महापालिकेतील जबाबदार अधिकारी पुन्हा पुन्हा सफाई आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

- गौतम खरात, अध्यक्ष, भारतीय कामगार शंक्ती संघटना, छत्रपती संभाजीनगर