औरंगाबाद (Aurangabad) : केंद्रीय पर्यटन विभागाने दिलेल्या अडीच कोटींच्या निधीतून मजनू हिल येथील टेकडीवर उभारण्यात आलेल्या रोझ गार्डनची तीन वर्षात वाट लावली आता उद्यानातील अर्धवट कामे पार पाडण्यासाठी पुन्हा दिड कोटीचा डीपीआर महापालिका करत आहे. यासाठी डीपी डिझाइन या पीएमसीची नेमणूक केल्याचे महापालिका उपअभियंता अनिल तनपुरे सांगत आहेत.
केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने औरंगाबाद पर्यटन मेगा सर्किट योजनेतून मजनुहील येथे तीन वर्षापूर्वी रोज गार्डन विकसित केले होते. १६ जानेवारी २०१४ ला या कामासाठी सर्वसाधारण सभेने विषय क्रमांक ४५५ नुसार अंदाज पत्रक तयार करणे, पीएमसीची (प्रकल्प सल्लागार समिती) निवड करण्यासंदर्भात सूचना केल्यानंतर २४ व २७ जानेवारी २०१४ रोजीच या कामासंदर्भात २ कोटी २४ लाख ६७ हजार ७३८ रुपयांच्या टेंडर सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र यानंतर २ कोटी ६९ लाख ३४ हजार ४५५ रुपयांचे अंदाजपत्रकीय रक्कम ठेवण्यात आली. त्यात अंदाजपत्रकीय दरापेक्षा १४.३१ टक्के कमी दराने टेंडर दर भरणाऱ्या मे. अशोक आणि जेव्ही कन्सट्रक्शनचे मुबारक पठाण यांना ३ जानेवारी २०१४ रोजी कामाची वर्कऑर्डर देण्यात आली होती. सदर योजनेंतर्गत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले होते. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करत तब्बल चार वर्षे हे काम रखडले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. विनायक निपुण यांच्या पुढाकाराने हे काम ऑगस्ट २०१५ मध्ये पुर्ण करण्यात आले होते.
अडीच कोटीत आठ कामे
यात महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत आणि उद्यान विभाग मिळुन २ कोटी ५१ लाख ६५ हजार ९६२ रूपयाचा चुराडा करत लॅन्ड स्केपींग व ब्युटीफिकेशन, कुंपन भिंत, पायाचे बांधकाम, पाथवे, वाॅटर सप्लाय आणि सॅनिटेशन, स्टाॅर्म वाॅटर ड्रेन, वाॅटर फाऊंटन, विद्युतीकरण अशी कामे करण्यात आली.
चौदा प्रकारचे गुलाब
चौदा प्रकारच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या झाडांनी हे उद्यान विकसित करण्यात आले होते. १५ ऑगस्ट २०१९ ला ते औरंगाबादकरांसाठी खुले करण्यात आले होते. पुढे मात्र महापालिका उद्यान विभागाला पुरेसा निधी आणि कर्मचारी नसल्याने उद्यान म्हणजे पांढरा हत्ती आणि त्याला पोसण्याचे बळच नसल्याने उद्यानाची पार वाताहत झाली.
तत्कालीन आयुक्तांच्या गुलाबी स्वप्नांवर पाणी
पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दरवर्षी ५० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी बरेच काही आहे. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी एक सुंदर नेत्रदीपक असे रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना २०१३ - १४ दरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी मांडली. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सैय्यद सिकंदर अली यांच्यामार्फत केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. केंद्र सरकारने तब्बल अडीच कोटी रुपयांचे अनुदानही दिले. या अनुदानातून ३ एकर जागेवर गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले. उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १४ वेगवेगळ्या स्वरूपाची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र आता निधीच नसल्याचे म्हणत त्याच्या संगोपणाकडे दुर्लक्ष झाल्याने वाताहत होत आहे. परिणामी कांबळेंच्या गुलाबी स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
आता गर्दूल्यांचा ताबा
उद्यानाचे बांधकाम करतानाच प्रवेशद्वाराची रचना लगतच असणाऱ्या स्लमभागाकडे करण्यात आल्याने गोळ्यांची नशा करणारे तरुण, गांजा ओढणारे, दारुडे बिनधास्त आत शिरत आहेत. सुरक्षारक्षकांनाही न जुमानणारे तरुण मोठ्या संख्येने फिरत असून, उद्यानात आलेल्या नागरिकांना शिवीगाळही करीत असल्याच्या तक्रारी बऱ्याच वाढत आहेत.
कोट्यावधीचा चुराडा
कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात रोज गार्डन मधील वाॅटर फाऊंटन,वाहता धबधबा आणि विद्युतीकरणाची कामे देखील निकृष्ट झाली असल्याचा आरोप खुद महापालिकेतील अधिकार्यानी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. फाऊंटन आणि वाहत्या धबधब्याला वाॅटर प्रुफींग न केल्याने पाणी जमिनीत मुरत असल्याने धबधबा आणि वाॅटर फाऊंटन बंद आहे. तर फाऊंटन लॅम्प देखील तूटलेले आहेत. तर बंद दिव्यांमुळे सायंकाळी हे उद्यान काळोखात बुडत आहे. त्यात अतिवृष्टीमुळे गुलाबाच्या झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे.
स्थापत्य ठेकेदाराचे विद्युत ठेकेदाराकडे बोट
या संदर्भात ठेकेदार मुबारक पठाण यांना विचारले असता त्यांनी विद्युतीकरणाची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप केला. निम्न दर्जाची केबल टाकल्याने बटन दाबताच केबल ब्लास्ट होत असल्याने फाऊंटन बंद असल्याचे ते म्हणाले.
बजेटच नाही , संगोपण कसे करणार
दुसरीकडे या गार्डनची देखभाल करण्यासाठी तननाशक आणि खतांसाठी बजेटच मिळत नसल्याने आम्हाला या उद्यानाचे संगोपण करणे शक्य नसल्याचे उद्यान विभागाचे म्हणणे आहे.तीन वर्षात आकारण्यात आलेल्या शुल्क पोटी २५ हजाराचे उत्पन्न आले. या तुटपुंज्या उद्यानातून तीन एकरातील दिड हजार झाडांची देखभाल कशी करावी, असाही प्रश्न अधिकाऱयांनी उपस्थित केला.
आता नव्याने दिड कोटीचा डीपीआर
एकीकडे अडीच कोटीची विकासकामे भकास होत असताना स्वच्छतागृहे, सुरक्षाखोली, पार्किंग, फुडप्लाझा, पाण्याची टाकी व इतर कामांसाठी आता न व्याने दिड कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवत असल्याचे उप अभियंता अनिल तनपूरे म्हणत आहेत.
पाकळ्यांना गळती
या उद्यानात गुलाबाची झाडे लावण्यासाठी १४ पाकळ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे दिड हजार झाडांची लागवड केली आहे. मात्र पाण्याचे हौदा प्रमाणेच पाकळ्यांच्या काॅक्रीट कठड्यांना गळती लागल्याने झाडांच्या मातीत पाणी मुरत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वाराच्या नमनालाच फरशीकाम विसरल्याने पायऱ्यांचे विद्रूपीकरण दिसते.