औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील नागरिकांना आता कुठे खड्डेमुक्तीतून गुळगुळीत रस्त्यांवर गाडी चालविण्याचा अनुभव मिळत होता, तोच शहरातील प्रमुख रस्त्यांचे पुन्हा एकदा खोदकाम होणार असल्याचे दिसत आहे. आता सीएनजी गॅस पाईपलाईनच्या (CNG pipeline) निमित्ताने रस्त्यांचे खोदकाम होणार असून, पुन्हा एकदा औरंगाबादकरांना खड्ड्यातून वाट काढावी लागणार हे स्पष्ट आहे.
शहरातील 9 प्रभागात मुख्य रस्त्यांलगत तसेच 118 वॉर्डात ठिकठिकाणी खोदकाम करून सीएनजी गॅस पाईपलाईनचे जाळे टाकले जात असून, यासाठी एकाच झोनमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 1 लाख 11 हजार 448 मीटर रस्ते खोदले जाणार आहेत. हे काम करताना कंत्राटदाराकडून सर्व निकष, नियम धाब्यावर बसवत नवेकोरे रस्ते , फुटपाथ खोदले जात असल्याची ओरड औरंगाबादकर करत आहेत. टेंडरनामा प्रतिनिधीने सदर कामाची पाहणी होत असताना या कामाच्या सबठेकेदार सय्यद कलीम गॅस वाहिनी टाकल्यावर रस्ते पूर्ववत करणार असल्याचे सांगितले.
शहरातील झोन क्रमांक 7 जवाहर काॅलनीमधून या कामाला सुरूवात झाली असून, रस्ता दुरूस्ती व निगराणी शुल्कापोटी भारत गॅस रिसोर्सेस लि. कंपनीने महापालिकेच्या तिजोरीत केवळ 9 कोटी 34 लाख 52 हजार 363 रुपये, तर सुरक्षा अनामत रक्कम म्हणून 23 लाख 96 हजार 214 रूपये तसेच परफोरमंस गॅरंटी म्हणून अडीच लाखाचा भरणा केलेला आहे. अर्थात कंपनीने एका झोनसाठी केवळ 9 कोटी 62 लाख 98 हजार 577 रूपयांचे एकूण शुल्क भरलेले आहे. गेल्या चाळीस वर्षानंतर खड्डेमय रस्त्याच्या यातनेतून औरंगाबादकरांची बऱ्यापैकी सुटका झाली होती. आधी भूमिगत केबल नंतर रिलायन्स जिओ व अन्य केबल कंपनीने कंबरडे मोडल्यानंतर आता सीएनजी गॅस पाईपलाईन अवघे शहर खोदले जाणार आहे. पाठोपाठ औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेसाठी हीच स्थिती निर्माण होणार असल्याने औरंगाबादकरांची वाट पुन्हा बिकट होणार यात तिळमात्र शंका नाही.
रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर सदर कंपनीने दुरुस्तीला ठेंगा दाखविला तर पावणे दहा कोटींच्या अत्यंत कमी शुल्कात रस्ता दुरूस्ती करणे महापालिकेला शक्य होणार नाही. विशेष म्हणजे हे खोदकाम सुरू असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याने मजूर विकास कामांच्या भुसभूशीत जागेत टिकावाचे घाव घालत आहेत. खोदलेल्या रस्त्यातून वाट बिकट होणार असल्याचे माहित असताना औरंगाबादकरांबद्दल सत्ताधारी ‘बेफिकीर’असून, लोक प्रतिनिधींच्या सोयीस्कर भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दोन हजार कोटींच्या योजना
अहमदनगर ते वाळूजमार्गे औरंगाबाद शहरापर्यंत दोन हजार कोटींतून सीएनजी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम नैसर्गिक वायू रिसोर्स कंपनीला वायू वाहिनी टाकण्याचे कंत्राट मिळाले आहे. 175 किमी अंतरावरून 24 इंची स्टील पाईपद्वारे औरंगाबादेत गॅस उपलब्ध होणार आहे. शहरात जवळपास सात लाखाच्या आसपास घरगुती गॅस जोडण्या यातून मिळणार असल्याचा दावा कंपनी करत आहे. यासाठी वाळुज औद्योगिक वसाहती, शेंद्रा, बिडकीन डीएमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध होणे शक्य होईल. या कामावर दोन हजार कोटी खर्च होत आहेत. दोन वर्षात हे काम पुर्ण होईल असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत शहरात 125 ते 20 मि.मी. व्यास जाडीच्या पाईपलाईन टाकणार आहेत.
आधी मिळवला परवाना मग सुरू केले खोदकाम
या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी कंपनीने डी. पी. असोसिएट कन्सल्टंट या संस्थेची नियुक्ती केली आहे. कंपनीने खोदकामासाठी औरंगाबाद महापालिका, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास व औद्योगिक महामंडळ यासह इतर विभागांचे परवाने या पाईपलाईनच्या कामासाठी मिळवले आहेत. त्यानंतरच खोदकाम सुरू केले आहे. प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर खोदणार...रक्कम कुचकामी ठरणार
या योजनेचा आवाका पाहता त्यात वाळूज महानगरसह वाळूज औद्योगिक वसाहती, औरंगाबाद तसेच शेंद्रा, बिडकीन डीएमआयसीतील नव्याकोऱ्या रस्त्यांचे लाखो मीटर खोदकाम केले जाणार आहे. यात रस्ता दुरूस्ती व निगराणी शुल्कापोटी जमा केलेली रक्कम कुचकामी ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एकाच प्रभागात लाखो मीटर खोदकाम
शहरातील प्रभाग क्रमांक सातमधून पहिल्या टप्प्यातील कामासाठी तब्बल 1 लाख 11 हजार 448 मीटर लांबीत खोदकाम सुरू केले आहे. कंत्राटदाराकडून मुख्य रस्ते व रस्त्यालगतचा भाग तसेच फुटपाथ खोदून गॅस वाहिनी टाकली जात आहे.
आधीचा अनुभव पाहता औरंगाबादकर संतप्त
याधी भुमिगत गटार योजना आणि विविध खाजगी केबल कंपन्यांनी खोदकाम केलेले मुख्य रस्ते व प्रभागातील रस्त्यांची गेली कित्येक वर्षे दुरुस्ती केली जात नसल्याने मागचा अनुभव आता सीएनजी आणि नंतर पुन्हा महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेने औरंगाबादकरांचा जीव धोक्यात सापडला आहे.
प्रशासक साहेब, तुम्हीच सांगा
मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागात गॅस वाहिनीची कामे सुरू आहेत. प्रभागात गल्लीबोळात 125 ते 20 एमएम गॅस वाहिनी टाकल्या जात आहे. चौका-चौकांत रस्ते, फुटपाथ खोदले जात असून, काही ठिकाणी एकच रस्ता पाच ते सहा वेळा खोदला जात आहे. रस्ता बुजविण्यासाठी मुरुमाचा वापर न करता तीच माती टाकली जात आहे. त्यातून वाट काढताना नागरिकांची दमछाक होत असल्यामुळे प्रशासक साहेब, तुम्हीच सांगा, यावर कसा तोडगा काढायचा, असा सवाल औरंगाबादकर कर उपस्थित करीत आहेत.
टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama
टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama
टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama