Raj Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Raj Thackeray : मुंबई-गोवा महामार्गाचेच कॉन्ट्रॅक्टर कसे पळून जातात? गौडबंगाल काय?

टेंडरनामा ब्युरो

पनवेल (Panvel) : कोट्यवधी रुपये खर्च करून चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचे असतील तर त्या ऐवजी ते यान महाराष्ट्रात पाठवले असते तरी चालले असते. त्यानिमित्ताने इथले खड्डे (Potholes) पण दिसले असते आणि कोट्यवधींचा खर्चही वाचला असता. आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात खड्डे मुक्त रस्ते बांधू शकत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकतो, असा रोकडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवेलमध्ये आयोजित मेळाव्यात विचारला.

राज्यातील सत्ताधारी आणि कंत्राटदारांची मिली भगत असून राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मात्र तरीही रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही, असेही ठाकरे म्हणाले. मुंबई - गोवा महामार्गाच्या अनेक वर्षे रखडलेल्या कामावरून राज यांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्ध मनसे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा राज यांनी आजच्या मेळाव्यात केली. २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरू झाले, त्यानंतर इतकी सरकारे आली पण रस्त्याचं काम झालेच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसे दिले जाते? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही? अशी खंत राज यांनी व्यक्त केली.

फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जायला ८ तास लागतात. लोकांचे ह्या रस्त्यांनी शब्दशः हाल केलेत. महाराष्ट्रात काय चालले आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६ कोटी रुपये इतका आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या, असा आरोप राज यांनी केला. मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला, तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई - गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का, अशी विचारणाही त्यांनी केली.

२०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे, असे राज म्हणाले.

सरकारला धडकी भरली पाहिजे...

पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत व्हावे ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असे आंदोलन नको, पण आंदोलन असे करा की सरकारला धडकी भरली पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.

ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावे. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावे. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकले आहे, त्याचं संवर्धन करा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी दिली.