Mumbai-Goa Highway Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai-Goa Highwayच्या जलदगती कामासाठी आता 'या' नव्या तंत्रज्ञानाचा वापर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या 42 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 23 किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन पेवर मशिनरींच्या मदतीने जोमाने सुरू आहे, हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील प्रलंबित कामासाठी आता नवीन सीटीबी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई ते गोवा या महामार्गाची पाहणी केली. पनवेल पासून सुरू झालेला मंत्री चव्हाण यांचा दौरा सिंधुदुर्गातील झाराप येथे संपला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. कशेडी घाटाच्या कामांमधील सिंगल लेन व परशुराम घाटाच्या रस्त्याचे कामही जोमाने सुरू आहे.

यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबई - गोवा महा‌मार्ग ५५० कि. मी. चा रस्ता आहे. या महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० पॅकेजेस सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पनवेल ते कासू या ४२ कि. मी. पैकी २२ कि. मी. सिंगल लेन काम पूर्ण झालेले आहे. या रस्ते बांधणीच्या कामासाठी नव्याने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ९ मीटरच्या पेवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम सुरु आहे. पेवरच्या माध्यमातून एका दिवसात ९०० मीटर काम होत आहे. सध्या मुंबई -गोवा महामार्गावर पहिल्या पॅकेजमध्ये २ पेवर मशीन्स काम करत आहेत. पहिल्या टप्यामध्ये साडेचार मीटरचे दोन पेवर काम करत आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये असेच दोन पेवर काम करत आहेत. या कामासाठी एक टार्गेट घालून देण्यात आले आहे, एक मशीन दर दिवशी कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी. रस्त्याचे काम करीत आहे.

पावसाने साथ दिली पाहिजे अशी आम्हीही प्रार्थना करत आहोत, पण जरी पावसाने साथ दिली नाही व रिमझिम पाऊस पडला तरी यामध्ये काम करता येऊ शकते. त्या पद्धतीने काम आता सुरू आहे. खात्री आहे की, मुंबई - गोवा महामार्गाचे सिंगल लेनचे काम येत्या गणपती पूर्वी नक्की पूर्ण होईल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील जे काम प्रामुख्याने प्रलंबित आहे. ते काम आता नवीन सीटीबी टेक्नोलॉजीने सुरु आहे. देशभरामध्ये अशा प्रकारच्या काही मशीन आहेत, या नवीन तंत्रज्ञानामध्ये चार ते पाच मशीनचा सेट असतो. त्यामधील तीन मशीनचा सेट आणलेला आहे आणि त्यामाध्यमातून काम सुरु झाले आहे. येणाऱ्या काळात ८ ते १० मशीन उपलब्ध करून रस्ता पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबई गोवा महामार्गाचे रायगड जिल्ह्यातील काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवापूर्वी येणार्‍या दिवसात जड वाहनांसाठी हा जर बंद केला तर आम्हाला जलदगतीने काम करता येईल आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जात आहे. पाली, निजामपूर मार्गे वाहतूक वळवण्याबाबत विचार सुरू आहे. हे काम जलदगतीने कस होईल याकडे लक्ष दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.