मुंबई (Mumbai) : मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे, त्यामुळे सिंगल लेन वरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टेंबरपासून ही लेन वाहतूकीस पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. आजच्या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा नागोठाणे पर्यंतच्या कामाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा तसेच जिते तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर येथील व नागोठाणे येथील कामाची पाहणी केली. यावेळी अत्याधुनिक मशिनरी मागवण्यात आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती उपस्थित अधिकार्याकडून घेतली. मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पांडापूर व नागोठणे येथे संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावरील कासूपासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ किमीचा रस्ता थोडा किचकट आहे. स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमे़ंट कांक्रीटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी रस्ता बनवताना २० टनी रोलरचा वापर केला जणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले असून पांडापूर येथे त्याची पाहणी केली. कासू पासून पुढील ७ किमी व नंतर ३.५ किमी अंतर आर्म टाॅपिग पद्धतीचा वापर होईल. या फेजमध्ये पळस, वाकण फाटा, जिंदाल गेट, कोलाड, इंदापूर या भागात विविध अंतरानुसार कामाची विभागणी केली आहे. तर इंदापूर जवळचा टप्पा पूर्ण करताना १६ किमी अंतर व्हाईट टाॅपिंग तंत्राचा वापर केला जाईल. असे त्यांनी यावेळी सा़गितले. यासाठी नियुक्त अधिकारी व यंत्रणेच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
महामार्गाची तातडीने कामे होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घागरे यांच्याशी चर्चा केली. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणाऱ्या हा महामार्गाची एक लेन गणेशोत्सव पूर्वी वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येईल आणि ९ मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार अशी माहिती यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, एनएचएआयचे मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रकल्प अभियंता यशवंत घोटेकर, कार्यकारी अभियंता निरज चोरे यासह विविध विभागांचे अधिकारी होते.
महामार्गावरील दोन तासापासून सुरु वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला पुढाकार -
मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेणजवळ हॉटेल साई सहारा जवळ एक एसटी बंद पडल्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सुटेना एसटी जागेवरच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील गाड्या तब्बल दोन तास अडकल्या होत्या. त्यामुळे जिते या गावाच्या पूलापासून हाॅटेल साई सहारा व तेथून पेण कडे जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही येथील परिसरात वाहनांच्या रांगा दूर वाढून वाहतूक कोंडीत भर पडत होती. बंद एसटी बस जागेवरून काढण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले व ते चालत होटल साई सहारा पर्यंत गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बंद एसटीला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले. सुमारे दोन तासानंतर हे यश आले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली व आता मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील दोन्ही मार्गांवरील वाहतूक अखेर मार्गी लागल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व गोव्याकडे जाणाऱ्या सर्वच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.