पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) मिळकतकरात ४० टक्क्यांची सवलत पुन्हा लागू केली आहे. मात्र, चालू वर्षातील बिल कोणते? ४० टक्क्यांची थकबाकी किती आहे? हे समजून घेताना नागरिकांचा गोंधळ उडत आहे.
दररोज हजारो नागरिक मुख्य महापालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चौकशीसाठी खेटे मारत आहेत. त्यामुळे हा गोंधळ कमी करण्यासाठी महापालिकेने स्पष्टीकरण देत त्यात सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
स्पष्टीकरण ः एक
एक एप्रिल २०१९ पूर्वी ज्यांच्या मिळकतीची नोंदणी झाली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात ज्या मिळकती आलेल्या नाहीत, त्यांना कोणताही ४० टक्के अतिरिक्त कर लावला नाही. त्यांची पूर्वीपासून सुरू असलेली सवलत आजही कायम आहे. त्यामुळे अशा मिळकतधारकांनी पीटी ३ हा अर्ज भरण्याची गरज नाही.
राज्य सरकारने देखभाल-दुरुस्तीची सवलत १५ टक्क्यांवरून १० टक्के इतकी केल्याने या नागरिकांना २०२३-२४ च्या बिलात पाच टक्के वाढ झाली आहे. पुणे शहरात बहुतांश निवासी मिळकतधारकांचा यात समावेश आहे.
स्पष्टीकरण ः दोन
एक एप्रिल २०१९ नंतर ज्या मिळकतींची नोंदणी झाली आहे, अशा मिळकतींची सरसकट ४० टक्के सवलत काढलेली आहे. त्यामुळे त्यांना २०१८ ते २०२२ पर्यंतची सवलत आणि भरलेल्या कराचा परतावा हवा असल्यास जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात १५ नोव्हेंबरपर्यंत पीटी ३ अर्ज पुराव्यासह भरून देणे आवश्यक आहे.
तसेच २०२३-२०२४ या वर्षाची कराची रक्कम पूर्ण भरावी लागेल. ज्यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत ४० टक्क्यांचे पैसे भरले आहेत, पुढील चार वर्षांच्या बिलात समायोजित केले जाणार आहेत. पीटी ३ अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत सादर न केल्यास सवलत गमवावी लागेल. पुण्यात अशा मिळकतधारकांची संख्या एक लाख ६७ हजार इतकी आहे.
स्पष्टीकरण ः तीन
महापालिकेने दोन कंपन्यांकडून २०१९ पूर्वीच्या मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण करून ज्यांनी भाडेकरू ठेवले आहेत किंवा ज्यांचे एकपेक्षा जास्त घरे आहेत, अशा ९७ हजार नागरिकांची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला.
या सर्वेक्षणात प्रचंड चुका असल्याने वादही निर्माण झाला आहे. सर्वेक्षणानुसार त्यांना २०१८ ते २०२२ या वर्षातील फरकाची रक्कम पाठविण्यात आली. ज्यांनी हे पैसे भरले आहेत, त्यांची रक्कम पुढील चार वर्षांत वळती केली जाईल. ज्यांनी भरले नाहीत, त्यांना ४० टक्क्यांची थकबाकी दाखवली जात आहे. त्यामुळे रद्द झालेली सवलत घेण्याकरिता व २०२३-२४ वर्षापासून ४० टक्के सवलत घेण्यासाठी पीटी ३ अर्ज भरणे बंधनकारक आहे.
त्यानंतर या कागदपत्रांची तपासणी करून जुनी सवलत दिली जाईल, तसेच ती पुढेही कायम ठेवली जाईल. पीटी ३ अर्ज न भरल्यास संपूर्ण रक्कम थकबाकीसह भरावी लागेल.
पीटी ३ अर्जासोबत हे कागदपत्र आवश्यक (कोणतेही दोन)
- सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट
- वाहन परवाना
- गॅस कार्ड
- रेशन कार्ड
ज्या नागरिकांना मिळकतकराची ४० टक्क्यांची सवलत कायम आहे, अशांच्या बिलावर २०२३_१, २०२३_२ असा तक्ता दिसेल. ज्यांच्या बिलावर २०२३_१, २०२३_२ या चालू वर्षाच्या बिलासह २०२३_३, २०२३_४ असा उल्लेख असेल, तर ती रक्कम ४० टक्के थकबाकीची आहे. त्यामुळे निवासी मिळकतीमध्ये स्वतः राहणाऱ्या मिळकतधारकाने ४० टक्क्यांची थकबाकी भरू नये. त्यांनी केवळ २०२३_१, २०२३_२ या तक्त्यातील चालू वर्षाचा कर भरावा. तसेच १५ नोव्हेंबरपूर्वी पुराव्यांसह पीटी ३ अर्ज सादर करावा.
- अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग