पुणे (Pune) : मोठ्या महत्प्रयासाने चार वर्षानंतर पुणे स्थानकावर सुरू झालेली प्रीपेड रिक्षाची सेवा आता राम भरोसे आहे. कारण प्रीपेड रिक्षाला शंभर दिवसांची दिलेली मुदत संपली असून, गुरुवारी (ता. ३१) या सेवेचा शेवटचा दिवस होता. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मुदतवाढ दिली नाही, तर या सेवेला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे.
पुणे स्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ नये, त्यांच्याकडून जादा भाडे आकारले जाऊ नये, याकरिता डॉ. केशव क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ‘रिक्षा मित्र’ या संकल्पना अंतर्गत प्रीपेड रिक्षाची सुरुवात झाली. २७ जुलैला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
‘प्रवासी सेवा संघ’ यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली. या सेवेला शंभर दिवसांची मुदत दिली होती. शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र, अद्याप सेवेसाठी कालावधी वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. प्रीपेड रिक्षाला ब्रेक लागला, तर प्रवाशांचे मोठे नुकसान होईल. प्रीपेड रिक्षांमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा उपलब्ध होतात.
शिवाय रिक्षाचे भाडेदेखील नियमाप्रमाणे आकारले जाते. सुमारे १२०० रिक्षाचालकांनी याठिकाणी सेवा देण्यासाठी नोंदणी केली होती. तर सुमारे ६०० रिक्षाचालक प्रीपेड रिक्षाच्या माध्यमातून सेवा देत. दिवसभरात सुमारे दोन हजार प्रवाशांकडून या सेवेचा वापर केला जातो.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रीपेड सेवेला सुरुवात झाली. आता देखील त्यांच्याच मंजुरीची आवश्यकता आहे. सेवेत खंड पडू नये, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे
प्रीपेड रिक्षाची सेवा खंडित होऊ नये, याकरिता वाहतूक पोलिस आणि प्राधिकरणाच्या सदस्यांना पत्र दिले आहे. अद्याप कोणाचेही उत्तर प्राप्त झाले नाही. आचारसंहिता असल्याने मुदतीत वाढ करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले आहे. मंजुरी नाही मिळाली, तर सेवा बंद करावी लागेल.
- डॉ. केशव क्षीरसागर, संचालक, केवोल्युशन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट ली, पुणे