Pune Municipal Corporation 
टेंडर न्यूज

पुणे महापालिकेचा अजब कारभार; गणेश विसर्जनानंतर काढले टेंडर

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचा प्रताप

टेंडरनामा ब्युरो

पुणे : महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचे एक उदाहरण समोर आले आहे. नियमांना फाटा देत गणपतीचे आधी विसर्जन करून मग कामाचे टेंडर काढण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. सदरचा प्रकार कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयात घडला आहे. गणेशोत्सवातील फिरत्या विसर्जन हौदावर मूर्ती संकलन केंद्रासाठी व इतर ठिकाणी तात्पुरती विद्युतविषयक कामे करण्यासाठी पालिकेकडून नुकतेच टेंडर काढले आहे.

गणेशोत्सवाचे नियोजन हे महापालिकेला आधीच माहिती असते. त्यानुसार नियोजन करण्याची गरज असते. विसर्जनाची जबाबदारीही महापालिकेची असते, तरीदेखिल महापालिकेने नियोजन केले नाही. निधी उपलब्ध करुन दिला नाही. गणेशोत्सवावर मर्यादा असून सार्वजनिक ठिकाणी गणेशविसर्जन करण्यास शासनाने निर्बंध घातल्याचे आधीच जाहीर करूनदेखिल कामाचे टेंडर वेळेवर का काढले गेले नाहीत? निविदा प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली नाही. तसेच, काम करुन घेतल्यानंतर निविदा काढण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे काम द्वारका साऊंड सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून करून घेण्यात आल्याची माहिती संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच, गणेशोत्सव ११ दिवसांचा असताना निवीदाप्रक्रियेत २० दिवासाच्या कामाचा उल्लेख करण्यात आला आहे. एकूण २ लाख ५३ हजार ६५२ रुपयांची ही निवीदा विद्युत खात्याअंतर्गत काढण्यात आली असून त्याची बयाणा रक्कम २५४० रुपये तर टेंडर शुल्क ४१५रुपये आहे.

गणेशोत्सव संपवून १२ दिवस झाले असताना परत त्याच कामांसाठी लाखोंची निविदा कशी काय काढली जाते. मग आधी काम केलेल्या कंत्राटदाराला पैसे कसे देणार?क्षेत्रीय कार्यालयाच्या अशा अनागोंदी कारभाराची आयुक्तांनी चौकशी करावी.

- आदित्य गायकवाड, नागरिक

गणेशोत्सवात निधी उपलब्ध झाला नव्हता. तरीदेखिल कंत्राटदाराकडून काम करुन घेण्यात आलेले आहे. तसेच, निविदा काढण्यास आणि जहिरात देण्यासही उशिर झाला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत. तरीही यामध्ये काही त्रुटी आढल्यास योग्य ती तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल.

- संदीप कदम, उपायुक्त, महापालिका, परिमंडळ ४.