Mutha River

 

Tendernama

टेंडर न्यूज

पुण्यातील नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यानंतर 'हा' उभारणार पर्याय

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीपात्रातील रस्ता कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्याय म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश असलेला मार्ग विकसित केला जाणार आहे. डेक्कन येथील सावरकर स्मारकापासून गरवारे महाविद्यालयाच्या परिसरातून हा रस्ता सुरु करून तो म्हात्रे पुलावर आणला जाणार आहे. मात्र, परिसरातील वस्ती आणि खासगी मिळकतींमुळे भूसंपादन करून हा रस्ता विकसित करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.

महापालिकेतर्फे मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या दोन टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन हा ३५० कोटींचा, तर बंडगार्डन ते मुंढवा हा ६०० कोटींचा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांत नायडू मैलाशुद्धीकरण केंद्रापासून ते मुंढव्यापर्यंत नदीच्या बाजूने ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे.

तीन पुलांचा होणार अडथळा
नदी सुधार करताना डेक्कन ते म्हात्रे पुलापर्यंत रस्ता सुशोभित करताना दोन्ही बाजूने पिचिंग केले जाणार आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, उद्यान, सायकल ट्रॅक अशी आखणी असेल. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात भराव टाकताना गेल्या शंभर वर्षांतील पुराचा व वहन क्षमतेचा विचार करून पिचिंग केले जाईल. त्यानंतर डेक्कन ते म्हात्रे पूल हा ३० मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग तयार केला जाईल. पण या दरम्यान यशवंतराव चव्हाण पूल, एस. एम. जोशी पूल आणि म्हात्रे पूल, असे तीन पूल येतात. या तिन्ही पुलांवरून हा मार्ग पुढे कसा जाणार, त्यासाठी नदीपात्रात इलोव्हेडेट पूल बांधले जाणार की नदीवरील पुलांच्या खालून रस्ता जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा रस्ता गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉलच्या पाठीमागून रजपूत झोपडपट्टी येथून जाणार असल्याने काही भूसंपादन करावे लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

तीस वर्षांपासून रस्ता प्रस्तावित
महापालिकेच्या १९८७ आणि २०१७च्या विकास आराखड्यात कर्वे रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथून म्हात्रे पुलापर्यंत ३० मीटर रुंद रस्ता दाखविण्यात आला आहे. तो शिवणे-खराडी या मार्गाला जोडणारा प्रस्तावित रस्ता आहे. मात्र, गेल्या ३० वर्षात याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. नदी सुधारच्या निमित्ताने हा मोठा रस्ता विकसित होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

या भागांतील रहिवाशांची गैरसोय
डेक्कन ते म्हात्रे पूल या दरम्यान सध्याचा नदीपात्रातील रस्ता हा निळ्या रेषेच्या आत आहे. तो रस्ता बंद केल्यास कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, खडकवासला, उत्तमनगर, शिवणे यासह इतर भागातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

केळकर रस्त्यावर वर्दळ वाढणार
नदी सुधार प्रकल्पात बाबा भिडे पूल काढून टाकला जाणार आहे. तसेच जयंत टिळक पुलापासून ते भिडे पुलापर्यंतचा रस्ताही काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्यायी मार्ग म्हणून केळकर रस्ता हाच एकमेव रस्ता आहे. महापालिकेने २०१७च्या विकास आराखड्यात या रस्त्यावर रुंदीकरण टाकले होते. मात्र, राज्य सरकारने ते काढून टाकल्याने हा रस्ता आहे तसाच राहणार आहे. पुढील तीन चार वर्षांत टिळक पूल ते म्हात्रे पूलादरम्यान नदी सुधारचे काम सुरू झाल्यानंतर केळकर रस्त्यावर वर्दळ वाढणार आहे.