Pune Municipal Corporation Tendernama
टेंडर न्यूज

दंडेलशाही करणाऱ्या ठेकेदारांकडून पुणे महापालिका वसुली करणार?

साडे पाच कोटींची थकबाकी वसूल करताना प्रशासनाच्या नाकीनऊ

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बड्या राजकीय मंडळींचा आणि गुंडांचा दबाव वापरून वाहनतळे (Parking) मिळविलेल्या आणि आता थकबाकी सवलत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारांचा (Contractor) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत हिशेब होणार आहे. महापालिकेलाच नव्हे तर पुणेकरांना दंडेलशाही करीत जादा पैसे घेणाऱ्या या ठेकेदारांकडून आता वसुली होणार की पुण्याचे कारभारी त्यांना पाठिशी घालणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शहरातील ३० पैकी १६ ठेकेदारांकडे ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी असून, यापैकी बहुतांश ठेकेदार हे काही नगरसेवकांचे (Corporator) कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

पुणे महापालिकेचे शहराच्या विविध भागात तीस वाहनतळ आहेत. हे सर्व वाहनतळ भाड्याने दिले असून, त्यांचे मासिक भाडे महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीनुसार निश्‍चित केलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात सहा महिने वाहनतळ बंद असल्याने त्या काळातील वाहनतळाचे तब्बल सव्वा कोटी रुपयांचे भाडे माफ करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे. एकीकडे साडे पाच कोटींची थकबाकी वसूल करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आलेले असताना दुसरीकडे कोट्यावधीची सवलत देण्याबाबत मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. पुण्यात १५ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत कडक लॉकडाऊन होता, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी वाहनतळ बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे ठेकेदारांनी या काळात महापालिकेला भाडे भरलेले नसल्याने ही थकबाकी जमा झाली.

महापालिकेच्या ३० पैकी १६ ठेकेदारांची ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये लॉकडाऊनमधील १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीतील १ कोटी २० लाख ५ हजार ५३९ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी माफ व्हावी यासाठी ठेकेदारांनी काही नगरसेवकांना भेटून मागणी केली. त्यानंतर हे भाडे माफ करण्यासाठीचा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, नगरसेविका नंदा लोणकर यांनी याबाबत स्थायी समितीपुढे १२ एप्रिल २०२१ रोजी ठराव दिला होता. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार स्थायी समितीपुढे आयुक्तांनी अभिप्राय सादर केला आहे.

काय आहे अभिप्रायात

  • १५ मार्च ते १५ सप्टेंबर या सहा महिन्याचे भाडे पूर्ण माफ करण्यास हरकत नाही

  • या सहा महिन्या व्यतिरिक्त इतर कोणतीही थकबाकी नाही अशांनाच याचा लाभ मिळेल

  • उद्यानांलगतची किंवा उद्यानांमधील वाहनतळाचे भाडे माफ करण्यास हरकत नाही

  • कोवीड सेंटर किंवा कोरोना चाचणी केंद्र

  • किंवा कोरोनासाठी इतर कारणांनी ज्या वाहनतळचा वापर झाला त्या काळातील शुल्क माफ करावे

  • रेल्वेच्या धर्तीवर भाड्यात ९० टक्के सवलत देता येणार नाही

  • ज्यांचा करार संपला आहे त्यांच्या भाड्यात १० टक्के वाढ करून मुदतवाढ देण्यात हरकत नाही

अशी आहे थकबाकी

  • थकबाकी असलेले वाहनतळ - १६

  • ३१-३-२-०२१ पूर्वीची थकबाकी - १.८३ कोटी

  • १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी - १.२० कोटी

  • १ ऑक्टोबर ते ३१ मार्च थकबाकी - १.३० कोटी

  • १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट थकबाकी - १.७ कोटी