Pune Tendernama
टेंडर न्यूज

आयुक्त विक्रम कुमारांनी खड्डा पाहिला अन् २५ हजारांचा दंड ठोकला...

हेमंत रासने यांनी विक्रम कुमार यांचा नुकताच पाहणी दौरा घडवून आणला

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्त्यांसह गल्लीबोळातल्या कामांचा दर्जा दाखविण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) थाटात आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांचा दौरा आखला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनाही बोलावून पालिकेने 'प्रेझेंटेशन' आणि दौऱ्याचा दिमाख वाढविला. पण, या कार्यक्रमाला दृष्टच लागली आणि विक्रम कुमारांच्या नजरेत खड्डा (Potholes) आला. दौरा आटोपून विक्रम कुमार पालिकेत गेले अन् लगेचच रस्ता बांधलेल्या ठेकेदाराला (Contractor) २५ हजारांचा दंड ठोठावला.

महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये मध्यवर्ती पेठांमध्ये सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले होते. लॉकडाऊन संपून बाजारपेठ पूर्वपदावर आली तरी या ठिकाणचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले तेथे काही ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते बुजविले तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकले आहे.

समान पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ, बुधवार पेठ यासह इतर भागात रस्ते खोदण्यात आले. याठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकून रस्ते दुरुस्त केले. पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, चेंबर बर आले आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आयुक्त विक्रम कुमार यांचा नुकताच पाहणी दौरा घडवून आणला. या भागातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना खड्डे व्यवस्थित बुजविले नसल्याचे आयुक्तांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रस्ते दुरुस्त करा असे आदेश पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ‘एल अँड टी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. आता आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत ठेकेदारालाच दंड ठोठावला आहे.