Pune Municipal Corporation

 

Tendernama

टेंडर न्यूज

पुणे महापालिकेचा टेंडर न काढताच डायरेक्ट खरेदीचा प्रस्ताव

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Education) देण्यासाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च यापूर्वीच केलेला आहे. पण यात माध्यमिकच्या इयत्तांचा समावेश नसल्याने आता एका ठराविक कंपनीचेच ॲप खरेदी करावे, असा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अस्तित्वातील यंत्रणेमध्ये सुधारणा न करता थेट ॲप खरेदी केली जाणार आहे. बाजारात अनेक ॲप असताना ठराविकच अ‍ॅपची शिफारस केली जात असल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण देता यावे यासाठी महापालिकेने सुमारे तीन वर्षापूर्वी तब्बल २१ कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये अद्ययावत सेंट्रल स्टुडिओ तयार केला. तेथून शहरातील सर्व शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देता येईल अशी सुविधा आहे. तर १२१ शाळांच्या इमारतींमध्ये एक स्टुडिओ आणि प्रत्येकी ती व्हर्च्युअल क्लास रूम तयार केल्या. यामध्ये इयत्ता १ली ते ६वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी सर्व अभ्यासक्रम तयार करून घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेले नाही, अनेकजणांनी शाळा सोडली आहे. पण या २१ कोटी रुपयांच्या यंत्रणेचा वापर शाळांना पूर्णक्षमतेने करून घेता आलेला नाही. मात्र, प्रशासनाकडून हा प्रकल्प सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा रुपाली धावडे यांनी ‘आयडीयल स्टडी’ हे अ‍ॅप महापालिकेने खरेदी करावे असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. यामध्ये ७ वी ते १० वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. १०वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे महापालिकेने हे अ‍ॅप विकत घेतल्यास त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येईल असे प्रस्तावात नमुद केले आहे. पण महापालिकेला कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा टेंडर मागवून ही प्रक्रिया केली जाते. पण काल (मंगळवारी) यावर जास्त चर्चा न करता थेट प्रस्ताव मंजूर केला आहे.

‘‘महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ॲप खरेदी करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यास मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासन घेईल.’’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती