मुंबई (Mumbai) : पुण्याहून महाडला (Pune to Mahad) पोहोचण्यासाठी धोकादायक वरंध घाटमार्गाला पर्यायी आणि सुरक्षित नवा मार्ग प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन मार्गामुळे महाड ते पुणे या प्रवासातील अंतर सुमारे २० ते ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे वेळ व इंधनाची सुद्धा मोठी बचत होईल.
पुणे ते महाड असा प्रवास करण्यासाठी सध्या भोर, वरंध घाट मार्ग आणि ताम्हिणी घाट मार्ग असे दोन प्रमुख रस्ते आहेत. वरंध घाट रस्ता पावसाळ्यामध्ये अतिशय धोकादायक होत असल्याने अनेकदा बंद असतो. बहुतांशी वाहतूक ताम्हिणी घाट मार्गे होते. त्यामुळे प्रवासातील अंतरही वाढते. महाडमधील नागरिकांची अनेक वर्षे या दोन घाटांना पर्याय म्हणून पुणे-मढेघाटमार्गे महाड असा रस्ता बांधावा अशी मागणी होती.
महाड औद्योगिक क्षेत्रासाठीही हा रस्ता सोयीचा असल्याचे सर्वेक्षणही झाले होते. परंतु वेल्हे ते मढेघाटमार्गे खडकाळ मार्गामुळे कामात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गोकुळशी, पांगारी ते महाड तालुक्यातील शेवते हा पर्यायी रस्ता भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सूचवला होता. त्यानुसार या ठिकाणची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता.
नवीन रस्ता कमी अंतराचा असल्यामुळे पुण्यातून महाड तसेच रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने इंधन व पैशाची बचत होईल. याशिवाय राजगड व रायगड या दोन स्वराज्याच्या राजधान्या पर्यटकांना पाहता येणार असल्याने या भागातील पर्यटनालाही चालना मिळेल.
सध्या पुणे, भोर, वरंध घाटमार्गे महाड हे अंतर १४० किलोमीटर आहे तर पुणे-ताम्हिणी घाटमार्गे महाड हे अंतर १६० किलोमीटर आहे. नवीन तयार होणारा रस्ता १२० किलोमीटर अंतराचा आहे.
पुणे व महाड येथील सर्वात कमी अंतराचा हा रस्ता असेल. रस्त्याच्या कडेला गटारे तसेच साईडपट्ट्या असतील. साडेसात मीटर रुंदी असेल. पिशवी गावाजवळ काही ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पिशवी आणि गुगूळशी या गावाजवळ दोन मोठे पूल बांधले जाणार आहेत. या मार्गात ९४ मोठ्या मोऱ्या तर ९०० मीटरची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. नवीन मार्गामुळे महाड ते पुणे या प्रवासातील अंतर सुमारे २० ते ४० किलोमीटरने कमी होणार आहे.
महाड-पुणे सर्वात जवळच्या अंतराचा मार्ग होणार असून त्यामुळे धोकादायक वरंध घाटमार्गाला पर्याय तयार होणार आहे. औद्योगिक क्षेत्रालाही हा रस्ता जवळचा रस्ता असल्याने उद्योजकांना महत्त्वाचा पर्याय ठरणार असून रायगड, राजगड, शिवथर घळ, वाळण कोंडी अशा अनेक पर्यटन स्थळांवर पोहोचणे सहज शक्य होणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रायगड व पुणे जिल्ह्यातील या मार्गावर येणाऱ्या अनेक गावांचा विकास होईल.
- संग्राम थोपटे, आमदार