Pune–Bengaluru Expressway Tendernama
टेंडर न्यूज

Pune Bengaluru Expressway News : पुणे-बंगळूर सुसाट; 50 हजार कोटींच्या द्रुतगती महामार्गाचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

Pune Bengaluru Expressway मुंबई : केंद्र सरकार भारतमाला प्रकल्पांतर्गत (Bharatmala Project) पुणे ते बंगळूर हा ७०० किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग साकारला जात आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरातील 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांवर येणार आहे. (Pune Bengaluru Expressway - Nitin Gadkari News)

तब्बल ५० हजार कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) देखरेखीखाली महामार्गाचे बांधकाम सुरू आहे.

पुणे-बंगळूर द्रुतगती मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटकातील 9 जिल्ह्यांमध्ये द्रुतगती मार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग बांधण्याचा मुख्य उद्देश पुणे, मुंबई आणि बंगळूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणे हा आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि परिसरातील आर्थिक विकासालाही चालना मिळेल.

पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीमुळे दोन्ही राज्यांमधील अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे. बंगळूर ते पुणे या प्रवासाला सध्या 18 ते 19 तास लागतात. नव्या महामार्गामुळे हा वेळ 7 तासांवर येईल. तसेच, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागणार नाही.

पुणे-बंगळूर द्रुतगती मार्ग 2028 पर्यंत तयार होईल असे नियोजन आहे. यासाठी अंदाजे 50,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या द्रुतगती मार्गावर सुरुवातीला 6 लेन असतील, ज्याचा नंतर 8 लेनमध्ये विस्तार केला जाईल. या महामार्गावर वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतील. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 72 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्रातील पुणे रिंगरोडपासून सुरू होणारा महामार्ग पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून कर्नाटकात प्रवेश करेल, त्यानंतर तो बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगळूर ग्रामीण या जिल्ह्यांमधून जाईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये पुणे-बंगळूर महामार्गाला मान्यता दिली होती. या नवीन महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच पण या क्षेत्राच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.