Sinhast Mahakumbh Tendernama
टेंडर न्यूज

Nashik : सिंहस्थ प्रारुप आराखडा फुगून 8 वरून 11 हजार कोटींवर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ मध्ये होत असून त्यादृष्टीने नाशिक महापालकेने सिंहस्थपूर्व तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या सिंहस्थ समन्वय समितीने सर्व विभागांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. या प्रारुप आराखड्यात महापालिकेने साधूग्रामसाठी ३००० कोटींच्या भूसंपादनाची भर घातली आहे. यामुळे सिंहस्थ आराखडा ११ हजार कोटींवर पोहोचला आहे.  मागील सिंहस्थात हजार कोटींच्या आसपास असलेला हा आराखडा जवळपास दहा पट वाढला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेच्या आराखड्यात नवीन रिंगरोडच्या कामांचा समावेश नाही. यामुळे भविष्यात हा आराखडा आणखी फुगण्याची शक्यता आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात येणारे भाविक, साधू यांना सोईसुविधा उभारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी दिला जातो.यामुळे प्रत्येक सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमधील अनेक विकासकामे मार्गी लागत असतात. मागील सिंहस्थांचा विचार करून यावेळी नाशिक महापालिकेने सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाला सिंहस्थाच्या अनुषंगाने विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या सर्व विभागांच्या विकासकामांच्या प्रस्तावांचे एकत्रिकरण करून अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सिंहस्थ समितीने सिंहस्थ प्रारुप आराखडा तयार केला आहे.

सिंहस्थ आराखड्यात बांधकाम विभागाने २५०० कोटी, मलनिस्सारण विभागाने ६२७ कोटी रुपये, पाणी पुरवठा विभागाच्या पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी १००० कोटी या पद्धतीने प्रत्येक विभागााने काम सुचवली असून त्यामुळे ८ हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार झाला. एवढ्या मोठ्या रकमेला केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाल्याने महापालिका आयुक्तांनी त्या आराखड्यात आवश्यक त्या बाबींचा प्राधान्याने समावेश करण्याच्या सूचना देऊन फेर आराखडा करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर महिन्याने प्रत्यक्षात अकरा हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार झाला आहे. पूर्वीच्या आठ हजार कोटींच्या आराखड्यात महापालिकेने साधूग्रामसाठी भूसंपादन करणे तसेच रिंगरोडला शहरातील अंतर्गत रस्ते जोडणे या तीन हजार कोटींच्या कामांचा समावेश केला आहे. दरम्यान या आराखड्यात सिंहस्थ परिक्रमा या नवीन रिंगरोडच्या कामांचा समावेश केलेला नाही. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती. यामुळे त्या कामाचा आराखड्यात समावेश केला नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पाहणीत या रिंगरोडचा पूर्वशक्यता अहवाल नकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रिंगरोडबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

प्रयागराज कुंभाचे अनुकरण
यापूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्यात तेथील सरकारने प्रचंड प्रमाणात विकासकामे करून भाविकांना व साधुंना सुविधा दिल्याने त्या कुंभमेळ्याचे कौतुक झाले होते. यामुळे नाशिक महापालिकेनेही सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यापूर्वी प्रयागराज व वाराणशी येथील कुंभमेळ्यात केलेल्या उपाययोजनांच्या पाहणीसाठी अभियंत्यांचे पथक अभ्यास दौऱ्यावर पाठण्याचा निर्णय घेतला आहे. नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीकाठी घाट विकास, प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. ही कामे महत्वाची असल्यामुळे वाराणशीप्रमाणे नाशिकलाही पुरेसा निधी मिळू शकतो, असे प्रशानसाला वाटते. यामुळे आराखडा तयार करताना कंजुषी न करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.