Road Tendernama
टेंडर न्यूज

टेंडरनामाचा पंचनामा; लॉकडाऊन असूनही 2 कोटींच्या रस्त्याची चाळण

सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे नव्याने काढले टेंडर

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : २ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेला १० किलोमीटरचा रस्ता लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात कसा उखडला गेला? त्यावरून जडवाहतूक बंद असतानाही खड्डे (Potholes) कसे पडले? कंत्राटदाराचे (Contractor) काम कोणत्या दर्जाचे होते? असे असंख्य प्रश्न टेंडरनामाच्या प्रतिनिधीने केलेल्या स्पॉटपंचनाम्यात समोर आले आहेत.

देवळाई ते भिंदोन १० कि.मी.रस्त्याची चाळण झाली असून, २४ महिन्यांपूर्वी २ कोटींचा खर्च करूनही लाॅकडाऊनमध्ये रस्ता उखडला गेला आहे. औरंगाबाद, शिवाजीनगर, बीड बायपास रोडवरील देवळाई चौकापासून ते कचनेर फाट्यापर्यंत अतिजिकिरीने वाहने चालवावी लागत आहेत. ठेकेदाराचा दोष निवारण कालावधी बाकी असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे २५ लाखांचे नव्याने टेंडर काढले होते. याबाबत गावकऱ्यांनी निकृष्ट कामावर आवाज उठवताच ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पसार झाले आहेत. आता आमदार संजय शिरसाट यांनी ५२ कोटीतून देवळाई चौक ते साई टेकडी क्राँक्रिटचा रस्ता करणार असल्याचे सांगितले आहे.

लॉकडाऊनमध्ये देवळाई मार्गावर जड व हलक्या वाहनांची वर्दळ बंद होती. कमकुवत सुधारणा केल्यामुळेच रस्त्याची चाळणी होऊन ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे नागरिकांच्या किरकोळ अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रस्ता दतर्फा असलेल्या नागरी वसाहतीतील सांड पाण्यात दडलेले खड्डे वाहनधारकांसाठी अनभिज्ञ असल्याने वाहन त्यात आदळून अपघातजन्य स्थितीतून सावरताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.

दोन कोटी डबक्यात....

लॉकडाऊनच्या काही महिन्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादच्या दक्षिण उपविभाग अंतर्गत औरंगाबाद आणि पैठण तालुक्याला जोडणाऱ्या औरंगाबाद, देवळाई, सिंदोन, भिंदोन, बाळापुर , सहस्त्रमुळी , चिंचोली , परदरी , लोहलातांडा, गाडीवाट, घारदोन, पोरगाव , पुढे ढोरकीन , बिडकीन, ताहेरपुर , कचनेर यासह शेकडो गावांना जोडणाऱ्या या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३५ देवळाई ते शिवगड ताडा पहिल्या टप्प्यातील १० कि. मी. रस्त्याची सुधारणा व दोन वर्षासाठी देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी सन २०१८ - १९ मध्ये बी - २ पध्दतीने ( क्रमांक २३) नुसार टेंडर मागवण्यात आले होते. त्यासाठी १ कोटी ९१ लाख ४७ हजार ४१२ रूपयाचा निधी लेखाशिर्ष ५०५४ - १०६ , जिल्हा व इतर मार्ग या नावाखाली शासनाकडून मंजुर करण्यात आला होता.

औरंगाबादच्या ठेकेदाराला मिळाले होते काम

या कामाचे कंत्राट औरंगाबादच्या चारनिया कन्स्ट्रक्शनचे रमजान चारनिया यांना ४ टक्के कमी दराने देण्यात आले होते. ११ सप्टेंबर २०१८ रोजी चारनिया यांना २४ महिन्याची मुदत आणि २ वर्ष देखभाल दुरूस्तीच्या अटीवर कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र शासनाकडून निधीची पुर्तता न झाल्याने या कामास विलंब झाला आणि लाॅकडाउनच्या चार महिने आधी रस्त्यावर डांबर शिंपडण्यात आले होते. त्यामुळे रस्ता काही दिवस गुळगुळीत झाला होता.

लाॅकडाऊन काळात उखडला रस्ता

मात्र २४ महिन्यात अर्थात दोष निवारण कालावधी पूर्ण होण्याआधीच रस्त्याचे तीन तेरा झाले. धक्कादायक म्हणजे लाॅकडाऊन काळात वाहतूक बंद असताना रस्ता का उखडला, असा सवाल सातारा- देवळाई परिसरातील नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

खड्डे की खोदकाम...

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची खोली चक्क अर्धा फूट ते दोन फुटांपर्यंत, अशी जीवघेणी आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने शिवाजीनगर वाणी मंगल कार्यालय ते रेल्वेफाटक , देवळाई चौक ते देवळाई गावापासून शिवगड तांडा ते कचनेर पर्यंत पाहणी केली. असे अनेक खोल खड्डे या महत्वाच्या वर्दळीच्या मार्गावर तयार झाले आहेत.

दोष निवारण कालावधी बाकी असताना काढले खड्डे बुजवण्याचे टेंडर

संततधार पाऊस उघडल्यानंतर या रस्त्यावरील हे जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले ; परंतु जुन्याच ठेकेदाराचा दोष निवारण कालावधी बाकी असताना अधिकाऱ्यांनी खड्डयांच्या समस्येवर तोडगा काढण्याची एका नव्या ठेकेदाराचा शोध घेत २२ लाखाचे टेंडर काढल्याची माहिती टेंडरनाम्याच्या तपासात समोर आली आहे. सदर ठेकेदाराने धोकादायक खड्डे बुजवण्यासाठी चक्क माती मिश्रित खडीचे ढिग खड्ड्यात टाकून पॅचवर्क केले जात असल्याचे समजताच देवळाईतील ग्रामस्थांनी आवाज उठवताच ठेकेदार अर्धवट ढिगार सोडून पसार झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अधिकारी फिलकले नसल्याचा आरोप केला जात आहे.

अपघाताचा दुहेरी सामना

आता रस्त्यावर पडलेले खडीचे ढिग आणि माती टाकल्याने वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच खड्डे त्यात सांडपाणी तुंबल्यामुळे अनभिज्ञ झाले आहेत. त्यात डोळ्यात जाणाऱ्या धूळीचा दुहेरी सामना करावा लागत आहे.

बीड बायपास ते साईटेकडी पर्यंत हा संपूर्ण रस्ता चढ उताराचा आहे. त्यात पावसाचे आणि आसपासच्या वसाहतींचे पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी नाहीत. गेल्या अतिवृष्टीमुळे हा डांबरी रस्ता लवकर खराब झाला. यावर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबादतर्फे ५२ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. जवळपास १२ मीटर रूंद आणि ५ कि.मीटर पर्यंत हा काॅक्रीट रस्ता तयार करणार आहोत. यात मार्गावरील भुसंपादन आणि पुलांच्या कामांचाही समावेश केलेला आहे. हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठीच मी मुंबईत आलो आहे.

- संजय सिरसाट , आमदार


अशोक येरेकर , सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना टेंडरनामाचे थेट प्रश्न :

प्रश्न : दोन कोटी रूपये खर्च करून रस्ता का उखडला?

उत्तर : या वर्षी अतिवृष्टीमुळे हा रस्ता उखडला आहे. यात ठेकेदाराचा दोष नाही.

प्रश्न : ठेकेदाराचा दोष निवारण कालावधी बाकी असताना खड्डे दुरूस्तीचे नव्याने टेंडर का काढले?

उत्तर : नाही, त्याचा १० ऑक्टोबरला कालावधी संपला होता. आता या रस्त्याला कुणीही वाली नाही. सरकार बजेट देत नाही. कुठल्या हेडखाली ही दुरूस्ती हाती घ्यावी याची आमच्याकडे प्रोव्हिजन नाही.असेच ओळखीच्या एकाला खड्डे बुजवायचे सांगितले. त्यानेही घोळ केल्याने आहे ते पॅचवर्कचे काम बंद केले.

प्रश्न : काॅक्रीट रस्ता तयार करणार असल्याचा प्रस्ताव पाठवल्याचे आमदार म्हणतात ते खरे आहे का?

उत्तर : होय, या रस्त्यावर अधिक खर्च टाळण्यासाठी तोच एक पर्याय असल्याने तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. मंजुरीसाठी विभागाकडून आणी स्वतः आमदार प्रयत्न करत आहेत.

माझा आणि या रस्त्याचा आता काही एक संबंध राहिला नाही. दोष निवारण कालावधी संपण्यापूर्वीच मी खड्डे भरून दिले होते. त्यानंतर अधिकार्यांनी रस्त्याची पाहनी करून माझी २० लाख रूपये सुरक्षा अनामत रक्कम देखील परत केली आहे.कालावधी संपल्यामुळेच या मार्गावरील खड्डे मुजवण्याचे नव्याने टेंडर काढले आहे.

- रमजान चारनिया, ठेकेदार


काय म्हणतात तज्ज्ञ

मुळात कोणत्याही डांबरी रस्त्याची सुधारणा करावयाची असल्यास आधी वाहतूकीची वर्दळ याचा अंदाज घेऊन आसपासच्या जमीनीची गुणवत्ता तपासूनच अंदाजपत्रक तयार करणे बंधनकारक आहे. त्यानंतर जुन्या रस्त्यातील डांबराचा लेअर दिड ते दोन फुटापर्यंत खोदून जीएसबी (ग्रन्यूअल सब बेस )अर्थात कठीण मुरूमाचा भराव टाकुण त्याची दबाई करणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्रेड वन आणि ग्रेड २ अर्थात कमी जास्त आकाराचे १० ते २० आणी ४० ते ५० असे खडीचे दोन थर टाकून रस्त्याची थिकनेस वाढवावी लागते. त्यानंतर डीबीएम (डेंन्स बीटूमन मॅकॅडम) अर्थात डांबर मिश्रित २० इंच आणि बीएम (बीटूमिनिअस मॅकॅङम ) अर्थात ८ ते १० इंच डांबर मिश्रित बारीक खडीचे थर टाकून त्यावर बीसी अर्थात (बीटूमिनिअस कारपेच) घट्ट डांबर मिश्रित ६ इंच खडीचा थर टाकून दबाई करणे आवश्यक आहे. हे सर्व करत असताना आसपासच्या वसाहतीचे आणि पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या एकून लाबीत चढ उतारावर छोटे छोटे कॅचपीट तयार करून नालीतून पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे.

- एम.डी.सोनवणे, सेवा निवृत्त शहर अभियंता