Narendra Modi Tendernama
टेंडर न्यूज

नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा संपली; मोदी यांच्या हस्ते फुटणार नारळ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रोच्या (Navi Mumbai Metro) सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या पहिल्या टप्प्यातील 5.96 किमी लांबीच्या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या 19 जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत त्याच दिवशी मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गांचा 35 किमी लांबीचा मार्गही सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

सिडकोने नवी मुंबई शहर वसवताना सार्वजनिक परिवहन सेवेचा प्रथम प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे ४० वर्षांपूर्वी बेस्ट च्या धर्तीवर बीएमटीसी बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मानखुर्द पासून पुढे वाशीपर्यंत रेल्वे सेवा कार्यान्वित व्हावी यासाठी खर्चाचा ६७ टक्के हिस्सा उचलून ती २८ वर्षांपूर्वी नवी मुंबईत आणली गेली. 

नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचा ही मे २०११ मध्ये प्रारंभ करण्यात आला मात्र पहिल्या चार वर्षात सुरू होणारी ही जलद सेवा गेली चार वर्षे रखडली आहे. देखभाल आणि संचालनसाठी महामेट्रोच्या हाती हा प्रकल्प दिल्यानंतर तिला वेग आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांच्या पुढाकारामुळे स्थापत्य वीज, तांत्रिक कामे आणि रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या खारघर ते तळोजा ही ६ किलोमीटर मार्गिका सुरू करण्याच्यादृष्टीने सज्ज आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळा जुळून येत नसल्याने या सेवेचे उद्घाटन रखडले होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दावोसमध्ये १६ ते २० जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारचे अधिकारी या दौऱ्यावर जाणार आहेत.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील उद्योगांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा आहे. अशातच आता पंतप्रधान मोदींचाही मुंबई दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे आता शिंदे फडणवीस यांना कदाचित दावोस दौऱ्याला जाता येणार नाही किंवा दौऱ्यातून लवकर माघारी यावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.