नवी दिल्ली (New Delhi) : PM Gati Shakti - 'पीएम-गतिशक्ती’ या राष्ट्रीय योजनेअंतर्गत सध्याच्या रेल्वे मार्गांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी तसेच रेल्वे मार्गांवरील वाहतुकीचा भार कमी व्हावा म्हणून आता काही नवे मार्ग तयार केले जाणार आहेत. (Indian Railway)
यासाठी देशातील सात रेल्वे मार्गांची निवड करण्यात आली असून यातून देशात २ हजार ३३९ किलोमीटरचे नवे मार्ग तयार होणार आहेत. ही योजना ३२ हजार कोटी रुपयांची असून या खर्चाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
सात मार्गांची निवड
- गोरखपूर-वाल्मिकीनगर (दुहेरी मार्ग)
- सोननगर ते अंडाल (बहुमार्ग),
- नेरगुंडी ते विशाखापट्टण (तिसरी लाईन)
- मुदखेड ते तेलंगणातील मेडचल मेहबूबनगर (दुहेरी मार्ग)
- गुंटूर ते बिबीनगर (दुहेरी मार्ग),
- चोपण ते चुनार (दुहेरी मार्ग)
- समाखैली ते गांधीधाम (चारपदरी मार्ग)
३५ जिल्ह्यांना लाभ
देशातील ३५ जिल्ह्यांत नवे रेल्वे मार्ग तयार होणार आहेत. ही योजना महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगण, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये राबविली जाणार आहे.
सात कोटी रोजगारांची निर्मिती
‘‘नवे रेल्वे मार्ग तयार झाल्याने माल वाहतुकीत वाढ होईल. यामुळे अन्न पुरवठा, रसायने, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड व कच्च्या तेलाची वाहतूक करण्यास मदत होणार आहे. देशातील माल वाहतुकीची रेल्वेची क्षमतासुद्धा २०० दशलक्ष टनांपर्यंत (प्रतिवर्ष) जाणार आहे. यामुळे देशात ७ कोटी रोजगारांची निर्मिती होईल,’’ असा दावा मंत्री वैष्णव यांच्याकडून करण्यात आला.