Toll Plaza

 

Tendernama

टेंडर न्यूज

गडकरींच्या जिल्ह्यातच टोलधाड; घोषणेनंतरही टोल वसुली सुरूच

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : चकाचक आणि खड्डे (Potholes) विरहीत रस्ते, टोल नाक्यांवर (Toll Plaza) वेळ जाऊ नये म्हणून फास्ट टॅग अशा सुविधा वाहनचालकांसाठी सुरु करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जिल्ह्यातच वाहन चालकांना केवळ २० किमी अंतरात दोनवेळा टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या टोलधाडीला राजाश्रय कोणाचा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतरही नागपूर-छिंदवाडा महामार्गावर वाहनचालकांना दोन वेळा टोल भरावा लागत आहे. या दोन्ही नाक्यांमधील अंतर केवळ २० किलोमीटर असून प्रत्येक ७० रुपये याप्रमाणे दीडशे रुपये मोजावे लागतात. हा प्रकार सुमारे दहा वर्षांपासून सुरु आहे.

मध्यप्रदेशातील छिंदवाडा आणि बैतूल या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केली आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना तत्कालीन केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी या महामार्गाचे काम सुरू केले होते. भाजपच्या त्यातही नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात या मार्गाचे काम झपाट्याने पूर्ण झाले आणि वाहतूकही सुरू झाली. छिंदवाडा आणि बैतूलला जाण्यासाठी सावनेर या शहरातून जावे लागते. सावनेर मतदारसंघ राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचा आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या पाटणसावंगी या गावात हा टोल नाका आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाड्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील शेवटचे गाव असलेल्या केळवद येथे टोल द्यावा लागतो. त्यामुळे छिंदवाड्याला जायचे असेल तर पाटणसावंगी आणि केळवद असा दोनदा टोल भरावा लागतो. पाटणसावंगीचा टोल नाका बैतूल मार्गावरील मध्य प्रदेशच्या सीमेवर हलवल्यास वाहनचालकांची दुहेरी टोलपासून सहज सुटका होऊ शकते. मात्र असे केल्यास बक्कळ कमाई बंद होईल त्यामुळे सर्ससपणे नाका सुरूच ठेवण्यात आला आहे.

या टोलनाक्याला सुरुवातीला स्थानिकांनी विरोध केला होता. पाटणसावंगीच्या सरपंच यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्थानिकांकडून टोल घेणार नाही, या अटीवर टोल नाका सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. पाटणसावंगी गाव तीनशे ते चारशे घरांचे आहे. हे गाव वगळात आजूबाजूच्या सर्वच गावांतील नागरिकांना टोल भरावा लागत आहे.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीच्या वेळी गडकरी यांनी स्थानिकांच्या मागणीची दखल घेतली. सावनेर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. राजू पोतदार यांच्या प्रचार सभांमध्ये गडकरी यांनी टोल नाका हटवण्यात येईल अशी घोषणा केली होती. यास आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. नाका त्याच जागेवर कायम आहे. डॉ. राजू पोतदार यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी तांत्रिक आक्षेपामुळे टोल नाका हटवता आला नाही असे सांगितले. त्यांचे नेते गडकरी असल्याने त्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली व सविस्तर बोलणे टाळले.