Aurangabad

 

Tendernama

टेंडर न्यूज

सरकारी टेंडरमध्येही 'भाईगिरी'; मर्जीतील ठेकेदारांसाठी दबाव

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : मर्जीतील ठेकेदाराला (Contractor) काम मिळावे यासाठी सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते सरसावल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. टेंडर (Tender) कॉल केल्यानंतर त्यात इतर कोणी भाग घेऊ नये, म्हणून ठेकेदारांवर दबाव टाकण्याचा प्रकार औरंगाबादेतील सार्वजनिक बांधकाम खात्यात सुरू झालेत. विभागातील भाईगिरीची चर्चा दबक्या आवाजात आता होऊ लागली आहे.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कामासाठी १८ कोटींचे टेंडर मागविण्यात आले आहे. या कामासाठी बाबा कन्स्ट्रक्शन, वंडर कंस्ट्रक्शन आणि एका कन्स्ट्रक्शन कंपनीने टेंडर भरलेले आहे. यातील दोघांनी बिलो टेंडर भरलेले असल्याने मर्जीतील ठेकेदाराला हे काम देण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत इतर ठेकेदारांनी सहभाग घेऊ नये, भरलेले टेंडर मागे घ्यावे, यासाठी राजकीय नेत्यांकडून फोनाफोनी सुरू झाली आहे. टेंडरसाठी सुरू झालेल्या भाईगिरीमुळे ठेकेदारवर्गात खळबळ उडाली आहे.

हा खेळ टक्केवारीचा

मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील काही शाखा अभियंता, उपअभियंतेही प्रयत्न करतात, इतर ठेकेदारांच्या फाईलमधील कागदपत्रे गहाळ करून अपात्र ठरविण्याची खेळी खेळली जाते,ही सगळी उठाठेव टक्केवारीसाठी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कामासाठी अभियंत्यांनी १८ कोटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. प्रत्यक्षात हे काम २५ ते २८ कोटींचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १८ कोटींचे टेंडर काढल्यानंतर वाढीव कामे दाखवून कामावरील एकूण खर्च वाढविण्याचा खेळ अधिकारी खेळत आहेत. कामांचे अंदाजपत्रक कमी दाखवून काम मंजूर करून घ्यायचे आणि नंतर त्याचे वाढीव कामे दाखवून अतिरिक्त निधी मंजूर करायचा असा काहीसा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुरू झाला आहे.

टेंडरची फेरतपासणी करावी

आधी कमी रकमेचे अंदाजपत्रक तयार करायचे, मर्जीतील ठेकेदारांना काम द्यायचे, नंतर वाढीव काम दाखवून आणखी खर्च वाढवायचा, अशा बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टेंडर विभागापासून तर शाखा आणि मुख्य अभियंतापर्यंत सर्वांचाच हातखंडा आहे. यावर सरकारने दखल घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या टेंडरची तपासणी त्रयस्तांमार्फत केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

- मोतीराम सदावर्ते, तक्रारदार