मुंबई (Mumbai) : ठाणे क्लस्टर योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेसह खासगी विकासकांच्या भूखंडावर २० ते २२ मजली टॉवर उभारण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत रहिवाशांना आपल्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत.
ठाणे महापलिका हद्दीतील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात अनेक इमारती पडून मोठी जीवितहानी होत असते. याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर योजना पुढे आणली आहे. नुकतेच या योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याअंतर्गत किसननगर भागासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. क्लस्टर योजना राबवत असताना, रहिवाशांना आता राहत असलेल्या घरातून बेघर न करता, त्यांच्या हाती थेट नव्या घराच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.
क्लस्टरची सुरुवात अंतिम भूखंड क्र. १८६/१८७ या वरील ७७५३ चौरस मीटर क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक २२ लगतचा भूखंड क्रमांक एफ - ३ या ठिकाणी १९,२७५ चौरस मीटर एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान १ व २ ची अंमलबजावणी सिडको मार्फत होत आहे. या ठिकाणी दोन एकरचा मुंबई महापालिकेचा मोकळा भूखंड आहे. त्या ठिकाणी २२ मजल्यापर्यंतच्या इमारती उभारल्या जाणार आहेत. या ठिकाणी सुमारे सहा टॉवर उभारले जाणार आहेत. या भूखंडाच्या बदल्यात ठाणे महापालिका तेवढ्याच किमतीचा ढोकाळी भागातील भूखंड बीएमसीला देणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेतील सूत्रांनी दिली.
क्लस्टरसाठी खासगी विकसकाचादेखील प्लॉट घेण्यात येणार आहे. या ठिकाणीदेखील २२ ते २८ मजल्यापर्यंतच्या इमारती उभारल्या जाणार आहेत. या विकसकाकडील ५० टक्के जागा महापालिकेने घेतली आहे. त्याबदल्यात त्या विकसकाला तेवढा एफएसआय हा त्याच्या ५० टक्के जागेत वापरता येणार आहे. त्यानुसार या ठिकाणीदेखील क्लस्टरचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही ठिकाणी १० हजार रहिवाशांना हक्काचे घर दिले जाणार आहे; तर येथील एकूण ३० हजार रहिवाशांना येत्या काही वर्षांत हक्काचे घर मिळणार आहे.