Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

Nitin Gadkari : वाहनातील प्रवास होणार सुरक्षित; गडकरींनी लॉंच केले नवे टेक्निक

टेंडरनामा ब्युरो

नवी दिल्ली (New Delhi) : वाहनांच्या रस्ता सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशाचा स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत एन-कॅप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते आज दाखल करण्यात आला. ३.५ टनांपर्यंत वजनाच्या मोटारींची क्रॅश चाचणी घेणारा हा उपक्रम आहे. भारत एन-कॅप एक ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एन-कॅप) हा भारताचा स्वतःचा क्रॅश चाचणी कार्यक्रम आहे आणि परदेशात आयोजित केलेल्या चाचण्यांपेक्षा स्वस्त आहे. यामुळे ग्राहकांना त्या उत्पादनाची गुणवत्ता समजून घेण्यास आणि माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेण्यास मदत होईल. भारत एनसीएपी आणि जागतिक क्रॅश मानकांमध्ये फारसा फरक नाही. सर्व घटकांचे मत विचारात घेऊन ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

परदेशात अशा क्रॅश चाचणीचा खर्च २.५ कोटी रुपये आहे आणि भारतात तो केवळ ६० लाख रुपये आहे. त्यामुळे एक चांगली बाजारपेठ विकसित होईल. या उपक्रमांतर्गत, मोटार उत्पादक स्वेच्छेने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) १९७ नुसार चाचणी केलेली त्यांची वाहने देऊ शकतात आणि चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारे, प्रौढ प्रवाशी आणि लहान मुलांसाठी वाहन किती सुरक्षित आहे, यासाठी शून्य ते पाच या प्रमाणात स्टार रेटिंग दिले जाईल, असेही गडकरी म्हणाले.

ज्या कंपन्या चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण वाहने बनवत आहेत, त्यांचा हिस्सा बाजारपेठेत वाढणार आहे. या सुरक्षा चाचणी उपक्रमामुळे उच्च सुरक्षा मानकांसह तयार होणाऱ्या भारतीय मोटारी जागतिक बाजारपेठेत चांगली स्पर्धा करू शकतील आणि भारतातील मोटार उत्पादकांची निर्यात क्षमता वाढेल. भारतीय वाहन उद्योग १२.५० लाख कोटी रुपयांवरून १५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, सातव्या स्थानावर असलेली भारतीय वाहन बाजारपेठ आता जपानला मागे टाकून चीन आणि अमेरिकेनंतर तिसरी सर्वांत मोठी बाजारपेठ बनली आहे, असेही ते म्हणाले.

वाहन उद्योग हा सरकारला सर्वांधिक कर देणारे क्षेत्र आहे. हा उद्योग राज्य आणि केंद्र सरकारला जास्तीत जास्त जीएसटी देत आहे. तसेच आत्तापर्यंत, या उद्योगाने चार कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या असून, एकूण जीडीपीतील त्याचे योगदान ६.५ टक्के आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.

रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक
रस्ते अपघात आणि वायू प्रदूषण यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. दरवर्षी आपल्याकडे पाच लाख अपघात आणि १.५ लाख मृत्यू होतात. दररोज ११०० अपघात आणि ४०० मृत्यू होतात. दर तासाला ४७ अपघात आणि १८ मृत्यू होतात. १८ ते ३४ वर्षे वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ७० टक्के आहे. यामुळे जीडीपीचे ३.१४ टक्के नुकसान होते. अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

वाहन उद्योगाकडून स्वागत
वाहन उद्योगाने भारताच्या क्रॅश चाचणी उपक्रमाचे स्वागत केले आहे. यामुळे वाहन सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा होईल आणि ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेण्यास मदत करेल. मारुती सुझुकी इंडियाने पहिल्या लॉटमध्ये या यंत्रणेद्वारे किमान तीन मॉडेल्सची चाचणी घेईल. ह्युंदाई मोटर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रेनॉल्ट यांनीही या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. रस्ता सुरक्षेला प्राधान्य दिल्याने, भारत एनसीएपी हे वाहनांच्या सुरक्षा मानकांचे मूल्यांकन आणि वाढ करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे, असे रेनॉ इंडियाने म्हटले आहे.