NHAI Toll News मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील टोल (Toll) दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
टोल शुल्कातील ही वाढ यापूर्वी १ एप्रिलपासून लागू होणार होती, मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ही वाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोलपोटी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
महामार्ग प्राधिकरणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की टोल शुल्कातील प्रस्तावित वाढ घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाईशी निगडीत आहे. राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क अंतर्गत सुमारे 855 टोल प्लाझा आहेत ज्यावर राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 नुसार वापरकर्ता शुल्क वसूल केले जाते. टोल शुल्क आणि इंधन उत्पादनांवरील कर वाढल्याने राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारास मदत होते.
मात्र, वाहतूक सेवेशी संबंधित राजकीय पक्ष आणि संघटना टोलच्या दरात वार्षिक वाढ झाल्याची टीका करतात. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढतो आणि प्रवाशांवर आर्थिक बोजा पडतो, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच टोल शुल्कात वाढ झाल्याने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आणि अशोक बिल्डकॉन लिमिटेडसारख्या कंपन्यांना फायदा होईल, असाही आरोप होतो.
गेल्या दशकात केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी अंदाजे 1,46,000 किलोमीटर आहे. हे जागतिक रस्त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे. 2018-19 मध्ये टोल संकलन सुमारे 25 हजार कोटी रुपये होते, 2022-23 मध्ये यात वाढ होऊन 54 हजार कोटी रुपये झाले.