NHAI Tendernama
टेंडर न्यूज

NHAI : 75 वेसाईड सुविधांसाठी टेंडर; प्रवाशांना दर्जेदार सुविधा

ब्राऊन फिल्ड आणि ग्रीन फिल्ड कॉरीडॉरमध्ये 75 वेसाईड सुविधांसाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय (NHAI) आगामी ३ वर्षात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर सहाशेहून अधिक ठिकाणी जनसुविधा केंद्रांची स्थापना करणार आहे. सध्या अनेक ब्राऊन फिल्ड आणि ग्रीन फिल्ड कॉरीडॉरमध्ये 75 वेसाईड सुविधांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जनसुविधा केंद्रांवर अनेक सोयीसुविधांची रेलचेल असणार आहे. त्यात इंधन भरण्याची सोय, चार्जिंग पॉइंट, फूड कोर्ट, किरकोळ विक्रीची दुकाने, बॅंक एटीएम, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, वैद्यकीय कक्ष, चाईल्ड केअर रूम, शॉवर आणि शौचालया सोबतच वाहन दुरूस्ती केंद्रे, ड्रायव्हरसाठी शयनकक्ष तसेच स्थानीय हस्तशिल्पांच्या विक्रीची सोय असणार आहे.

एनएचएआयने आधीच अशाप्रकारच्या 160 जनसुविधा केंद्रांना मंजूरी दिली आहे, त्यातील 150 केंद्रांचे वाटप गेल्या दोन वर्षांत झाले आहे. आगामी वर्षांत आणखी 150 ठिकाणी वेसाईड सुविधा सुरु केल्या जाणार आहेत. यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, अमृतसर-भठींडा-जामनगर कॉरीडॉर आणि दिल्ली-अमृतसर-काटरा एक्सप्रेसवे सारख्या ग्रीन कॉरीडॉरचा समावेश आहे.

सध्या अनेक ब्राऊन फिल्ड आणि ग्रीन फिल्ड कॉरीडॉरमध्ये 75 वेसाईड सुविधांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. एकूण आठ राज्यात या सुविधा सुरू करण्यात येत आहेत. ज्यात राजस्थानात 27, मध्य प्रदेशात 18, जम्मू आणि कश्मीर मध्ये 9, आणि हिमाचल प्रदेशात 3 केंद्रांचा समावेश आहे. रस्त्यांशेजारील या सुविधामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक तसेच सुविधाजनक होणार आहे. महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर दर 40 ते 50 किमी अंतरावर जनसुविधा केंद्रांची उभारणी होणार आहे.