मुंबई (Mumbai) : मुंबई - गोवा महामार्गावरील (Mumbai - Goa Highway) कशेडी बोगद्याचे (Kashedi Tunnel) काम रखडल्याने कोकणातील नागरिकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. साधारणपणे गणेशोत्सवापर्यंत बोगद्यातील एक मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असा अंदाज आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणची पाहणी करून बोगद्यातील एक मार्ग पावसाळ्यापूर्वी खुला करण्याची सूचना केली होती.
पावसाळा कालावधीमध्ये कशेडी घाट हा दरडीचा घाट म्हणून ओळखला जातो. या घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे असे प्रकार घडत असतात. त्याचबरोबर वाढते अपघात देखील घाटात होत असल्याने हा घाट धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर २०१९ पासून हाती घेण्यात आलेल्या कशेडी बोगदातील काम सध्यस्थितीत रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. ठिकठिकाणी अपूर्ण असलेल्या कामांमुळे बोगद्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन मात्र कामाच्या पूर्णत्वाचा दावा करत आहे. तर प्रत्यक्षात अपूर्ण कामामुळे बोगदा कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
बोगद्यामधील दोन पुलांसाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुलाचे गर्डर या तंत्रज्ञानाने बसवण्यात आले आहे. यापैकी एक पूल बेसिक तंत्रज्ञानाने बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, रखडलेल्या कामांमुळे संरक्षक भिंतीला देखील धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असून, दरडीचा धोका बोगद्यात कायम आहे.
कशेडी मधील दोन्ही बोगदे अत्याधुनिक तंत्रज्ञाने तयार करण्यात येत आहेत. यासाठी बुमर मशीनच्या सहाय्याने बोगदा खोदण्यात आला आहे. बोगदा खोदण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे कोणती दुर्घटना न घडल्याने बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एका बोगद्यात एका वेळी तीन वाहने तीन लेन मधून जाऊ शकणार आहेत. मात्र या कामात वायुविजन व्यवस्था अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा बोगदा पावसाळा कालावधीमध्ये वेग घेऊन आगामी सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कशेडी बोगद्याचे काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे काम मंदावले होते. परंतु आता या कामाने वेग घेतला असून गणपतीपूर्वी या बोगदातील एक लेन सुरू करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत, सद्यस्थितीत बोगद्याचे काम ८२ टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.